नितीन बोंबाडे
डहाणू : ३१ डिसेंबर वर्षांअखेरच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात परराज्यातील दमण बनावटीच्या मद्य तस्करीच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबरच्या नियोजित पाटर्य़ासाठी धाबे, समुद्रकिनारे, हॉटेल यांची तपासणी करून ३१ डिसेंबरच्या पार्टी परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मात्र ओमेक्रॉनच्या परिस्थितीवर शासनाकडून निर्देशानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक विजय भुकन यांनी ‘लोकसत्ता’शी सांगितले. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर डहाणू, चिंचणी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा उत्साह दिसत आहे. विशेष म्हणजे डहाणू समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये पर्यटकांचे बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी तसेच नगरांमध्ये रात्री पार्टी वेळ नेमून देण्यात येणार आहे. त्यानंतरच्या पार्टी बहादुरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षकांनी दिली. पालघर जिल्हयात राज्य उत्पादन विभाग पालघर यांनी वसई, विरार, मुंबई-अहमदाबाद महामार्ग येथे प्रत्येकी १, मुंबई गुजरात सीमा तपासणी नाका येथे २ अशी एकूण ५ विशेष पथके नेमून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमा भागातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतून मोठय़ा प्रमाणात दमण बनावटीच्या मद्याची अवैध तस्करी केली जाते. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तलासरी तालुक्यातील आच्छाड, उधवा तर किनारपट्टीलगत झाई हे चोरटय़ा वाटेचे मार्ग आहेत. रात्री किंवा पहाटे ही वाहने महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर त्याचे वितरण पालघर, मुंबई, रायगड या भागांत केले जाते. त्यामुळे सीमा भागात दोन पथके नेमण्यात आली आहेत. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी व नववर्ष स्वागतासाठी डहाणू समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी मोठी गर्दी उसळते. किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये आगाऊ बुकींग झालेली असते. मात्र मागच्या वर्षी करोना साथीच्या प्रभावामुळे व्यवसाय बसला होता. यावेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्ट, हॉटेले सज्ज झाली आहेत.
सीमा भागातून येणाऱ्या मद्य तस्करीसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. शासनमान्य दुकानातून मद्य खरेदी करावे. उत्पादन शुल्क बुडवून आणलेले मद्य खरेदी करु नये.
– विजय भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघर