लाखोंचा खर्च केल्यानंतरही पालघर पावसाळ्यात पाण्याखाली
निखिल मेस्त्री
पालघर : करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत. त्यांची मुलेही सोबत असल्यामुळे मोठा वर्ग शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात आहे. पालघर शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी करोना काळात केलेल्या सर्वेक्षणात तीन हजार ८६५ मुले जिल्हा, तालुका, तसेच राज्याबाहेर स्थांतरित झाली आहेत. तर १६७२ मुले इतर जिल्ह्यतून, राज्यातून जिल्ह्यत दाखल झाली आहेत.
१५ प्रभाग असलेल्या व पाच किलोमीटर परिघात वसलेल्या पालघर नगर परिषद क्षेत्रात पूर्वापार असणारे नालेसफाई ही कंत्राटी पद्धतीने केली जाते. त्यासाठी प्रतिदिन नगर परिषद २० ते २२ हजार रुपये खर्च करीत असते. मुळात नगर परिषदेच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या नालेसफाई समाधानकारकरीत्या होत नसल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. परिणामी रस्त्यावर गटाराचे पाणी येत असल्यामुळे दुर्गंधी पसरून पालघरवासीयांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे.
नगर परिषद क्षेत्रात काही भागांत रस्त्यालगत असलेल्या गटारांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सफाई होत नाही. तसेच काही ठिकाणी भुयारी नालेअसल्याने त्याची झाकणे उघडून सफाई करणे अपेक्षित असताना तसे होत नाही. याउलट सफाई केल्याचे खोटे चित्र संबंधित ठेकेदाराकडून उभे केले जात आहे. हे नागरिकांनी नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत आरोग्य समिती सभापती अमोल पाटील यांना विचारले असता गटार स्वच्छतेबाबत तक्रारी असतील तर त्या पाहून घेतो. त्यानंतर कळवितो, असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले. पालघर नगर परिषद क्षेत्रातील गटारे अजूनही एकमेकांना जोडली गेली नाही. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन पूर्णपणे फोल ठरत आहे. गटारसफाई ठेका दिल्यानंतरही ठेकेदारामार्फत गटार सफाई योग्यरीत्या होत नाही. तसेच ही सफाई करताना नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांचा त्यावर अंकुश नसल्याने वरचेवर गटार सफाई केल्याचे दाखवून लाखोंची देयके उकळली जात आहेत. ही देयके अदा करण्यासाठी नगर परिषदेच्याच काही पदाधिकाऱ्यांचा तगादा असतो, असेही सांगितले जाते. त्यामुळे पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये गटार सफाई कामांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत.
पोकलन, जेसीबीसाठीही ठेका
नगर परिषदेने गटार सफाईसाठी ठेका दिला असला तरी नव्याने चर खणणे, पाणी निचरा करण्यासाठी चर बनवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पाणी निचऱ्याचे व्यवस्थापन करणे आदी कामासाठी पोकलेन, जेसीबी व डंपर यासाठी दुसरा ठेका दिला आहे. त्याचीही देयके लाखो रुपयांच्या घरात आहेत.
नालेसफाई ठेक्याची रक्कम अशी
एप्रिल २०२० या महिन्यात ६,३१,६९०, मे मध्ये ६,२८,२००, जूनमध्ये ६,४९,१४०, जुलैमध्ये ६,२८,२००, ऑगस्टमध्ये ६,४९,१४०, सप्टेंबरमध्ये ६,३५, ८७८, ऑक्टोबरमध्ये ६,२८,२००, नोव्हेंबरमध्ये ६,४९,१४०, डिसेंबरमध्ये ६,१२,९१८, जानेवारी २०२१ मध्ये ६,४९,१४० फेब्रुवारीमध्ये ६,४९,१४०, मार्चमध्ये ५,८५,६२६, एप्रिलमध्ये ६,४९,१४०, मेमध्ये ६,२८,२००, जूनमध्ये ६,३३,४३५ असे १५ महिन्यांत एकूण ९५ लाख सात हजार १८३ रुपये गटारसफाईसाठी खर्च केला गेला आहे.
कोटय़वधींचा निधी खर्च करूनही पावसाळयात नगरनपरिषद पाण्याखाली जाते. त्यामुळे या कामात घोटाळा झाल्याची दाट शक्यता आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.
-रोहिणी अंबुरे, नगरसेविका
नाल्यांची कामे बनावट आहेतच. मात्र आता नालेसफाईची कामेही तकलादू असल्याने पावसाळ्यात शहर पाण्याखाली असते. नगर परिषदेने नागरिकांना सुविधा देणे आवश्यक आहे. असे अनेक घोटाळे झालेले आहेत.
-सुधीर गुप्ता, नागरिक, देवीसहाय रस्ता