‘सायलेन्सर’ काढून पालघर पोलिसांची दंडात्मक कारवाई

पालघर : शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकींचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना मोठा त्रास होत होता. हे लक्षात घेत कर्णकर्कश आवाज काढून स्टाईल मारणाऱ्या दुचाकीस्वारांना पालघर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दुचाकींचा सायलेन्सर काढून आतापर्यंत ४५ दुचाकीस्वारांकडून ४५ हजार रुपयाची दंडात्मक रक्कम कारवाईमार्फत आकारली आहे.

कर्णकर्कश आवाजासाठी सायलेन्सर लावलेल्या पोलिसांच्या दुचाकीसह इतर दुचाकींवर पालघर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे. त्यामुळे या दुचाकीस्वारांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे. यासह विविध प्रकारच्या नावाच्या नंबर प्लेट्स लावणाऱ्या दुचाकीवरही कारवाई केली आहे. आतापर्यंत शेकडो नंबर प्लेट्स काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली आहे. कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीवर कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे व पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल कौतुकही केले जात आहे.

दुचाकींना कर्णकर्कश आवाज यावा यासाठी पालघर शहरांमध्ये अनेक जणांनी दुचाकीच्या मूळ भागांमध्ये बदल करून विविध प्रकारचे सायलेन्सर लावले होते. यामुळे दुचाकींना विशेष आवाज येत असला तरी हा आवाज कर्णकर्कश असल्यामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांनाही याचा मोठा त्रास जाणवत होता. हे लक्षात घेत पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी अशा दुचाकीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून ही कारवाई पालघर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. विशेष म्हणजे कारवाई केलेल्या दुचाकींमध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे.

पालघर शहरातील चार रस्ता, आंबेडकर चौक, वळण नाका अशा पोलीस नाक्याच्या व गस्तीच्या ठिकाणी असे दुचाकी आढळल्यास त्यांना जागेवरच थांबवून त्यांच्या गाडीतून सायलेन्सर काढून घेण्यात येत आहे व गाडीचे मूळ सायलेन्सर बसवण्याच्या सूचना चालकांना दिल्या जात आहेत. याचबरोबरीने ज्या दुचाकीवर विविध नावांच्या व साध्या पद्धतीच्या नंबर प्लेट्स नसतील, अशांवर दंडात्मक कारवाई करून या नंबर प्लेट्स काढून घेतल्या जात आहेत. सायलेन्सर व नंबर प्लेट्स पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

दुचाकीच्या मूळ भागांमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजासाठी सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकीवर कारवाई केली जात आहे. पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनचालकांना यातून धडा मिळेल. इतरांना त्रास होईल असे कृत्य दुचाकीस्वारांनी करू नये हेच आवाहन राहील.

– दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे</strong>