लोकसत्ता वार्ताहर

पालघर : शाळांच्या परीक्षा संपल्या असून सुट्ट्यांच्या कालावधीत गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रवाशांच्या सोयीकरिता राज्य परिवहन विभागाकडून १५ एप्रिल ते १५ जून या उन्हाळी हंगाम कालावधीत पालघर जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये पुढील दोन महिन्यासाठी अतिरिक्त २९ बस फेऱ्या रोज धावणार आहेत. तर मागील वर्षी ३८ बस फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या.

राज्य परिवहन विभागाच्या जवळपास तीन हजार किलोमीटरच्या शालेय फेऱ्या बंद झाल्या असून शालेय बसेस आता शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे तशाच उभ्या राहतात. सुट्ट्यांच्या कालावधीत गावी जाणारे तसेच लग्नसराई, उत्सव, पर्यटनस्थळ व देवस्थानांना जाणाऱ्या प्रवाशांची अधिक गर्दी असते. त्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाने उन्हाळी जादा वाहतूकीसाठी या शालेय बसेस १५ एप्रिल पासून १५ जून पर्यंत नागरिकांच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यात आठ आगारांमधून ४१० बस धावत असतात. यामध्ये जवळपास दीड लाख दैनंदिन प्रवासी प्रवास करत असून यामध्ये ५० हजार हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारातून २९ जादा बसेस सुरू केल्या आहेत.

बस दरात सवलत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के व ७५ वर्षांवरील जेष्ठांना विनामूल्य प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच पुढील दोन महिन्याकरिता शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

सुट्टी कालावधीत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मुळ गावी जाण्याकरिता व शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर परत येण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज करून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत गावी व इतर ठिकाणी फिरायला विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी एसटी बसचा लाभ घ्यावा. तसेच यावर्षी पहिल्यांदा नालासोपारा येथून ग्रुप बुकिंगने कोकणात जाणाऱ्या प्रवासासाठी बस एप्रिल महिन्यात बुकिंग होत आहेत. -कैलास पाटील, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन पालघर विभाग.

पालघर : जामखेड, शिर्डी, यावल (अमळनेर विस्तारित), छत्रपती संभाजीनगर
सफाळा : पाचोरा, पाचोरा (चाळीसगाव विस्तारीत), जळगाव (धुळे विस्तारीत)
वसई : मिरज, जळगाव
अर्नाळा : छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर<br>डहाणू : जामनेर, नंदुरबार, कोल्हापूर, जालना, बीड
जव्हार : चाळीसगाव, संगमनेर, संगमनेर, संभाजीनगर, शहादा, नंदुरबार, संभाजीनगर, बारामती
बोईसर : ज्योतिबा, सोलापूर
नालासोपारा : अक्कलकोट, कोल्हापूर, आंजर्ले