पालघर : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी सेवा पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, भाजीपाला विक्रेत्या महिला, बागायतदार, शेतकरीवर्ग सुखावले आहेत. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चालक-वाहक व इतर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एसटी धावू लागली आहे.
दीर्घकाळ एसटी सेवा कर्मचारी वर्गाच्या संपामुळे बससेवा बंद असल्यामुळे एसटीला मोठा तोटा झाला होता. एसटीच नव्हे तर या सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवासीवर्गालाही आर्थिक फटका बसला होता. आता सेवा सुरू झाल्याने तोटा हळूहळू भरून निघत आहे व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोमधून एसटी सेवा सुरळीत झाली आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे ग्रामीण भागासह लांब पल्ल्यांच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत
पालघर, सफाळे, डहाणू, जव्हार, बोईसर, अर्नाळा, वसई, नालासोपारा या एसटी डेपोमधून ठाणे, नाशिक, औरंगाबाद, स्वारगेट, शिर्डी, जुन्नर अशा विविध सेवा सुरू झाल्या आहेत. लवकरच हंगामी व उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी सेवाही सुरू होणार आहेत. त्यामुळे एसटी बसने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना व सुट्टीसाठी गावी जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दररोज पालघरच्या विभागातून शेकडो फेऱ्या सुरू झाल्याने एसटी पूर्वपदावर आली असून सुमारे ३० ते ४० लाख रुपये प्रतिदिन उत्पन्न मिळत आहे. याचबरोबरीने एसटी सेवेचे कार्गो मालवाहू सेवाही सुरू आहे.
जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, तलासरी, डहाणू अशा ठिकाणच्या ग्रामीण भागांमध्ये एसटीवर लाखो प्रवासी अवलंबून होते. मात्र पाच महिने एसटी ठप्प झाल्यामुळे या प्रवाशांचे मोठे हाल झाले. कर्मचारी सेवेत पुन्हा रुजू झाल्यामुळे एसटी सेवा सुरळीत सुरू झाली आहे. सर्व आगार मिळून सुमारे ३०० पेक्षा जास्त बसची सेवा आतापर्यंत सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालघर विभागामार्फत दिली आहे.
एसटी बस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी ही आम्हाला जीवनवाहिनीसारखी आहे. खासगी प्रवासी वाहनपेक्षा एसटीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तसेच एसटी बसचे भाडे कमी असल्यामुळे प्रवासासाठी आम्ही तिला प्राधान्य देतो. एसटी सुरू झाल्याचे समाधान आहे. -रमण बुधऱ्या, रिंजड, एसटी प्रवासी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा