वाडा : श्वानांचा बंदोबस्त करून त्यावर प्रभावी उपायोजना करण्याची आवश्यकता भासल्याने वाडा नगरपंचायतीकडून प्राणी जन्म, नियत्रंण कार्यक्रम (ABC) राबविण्यास आरंभ झाला. मात्र हा कार्यक्रम अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. शिवाय हे निर्बीजीकरण केंद्र एका कुक्कुटपालन शेडमध्ये कार्यरत केल्याने श्वानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

वाडा नगरपंचायतीने श्र्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी बीड (आष्टी) येथील मे. युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची नेमणूक करून या संस्थेला कामाचा आदेश ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला आहे. यासाठी साधारण आठ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी यापूर्वी सांगितले होते. श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी होणारा विलंब झाल्यानंतर नागरिकांनी आवाज उठविल्याने प्रत्यक्षात जानेवारी २०२५ पासुन श्र्वानांचे निर्बीजीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली. मात्र, या कामाचा ठेका ज्या संस्थेला दिला आहे, त्यांच्याकडून हे काही दिवस सुरु होते, मात्र पुन्हा हे काम अवघ्या दोन महिन्यानंतर (मार्च पासून) बंद आहे.

वाडा शहरात श्वानांचा उपद्रव असून १५ – २० श्वानांच्या टोळ्यांच्या समूहाने मोठ्या प्रमाणावर वावर होत असुन नागरिकांवर हल्ले होवून चावा घेण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे श्वानांचे निर्बीजीकरण करीता नेमलेली युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्था व वाडा नगरपंचायत प्रशासन नागरिकांना अंधारात ठेवून नागरिकांच्या भावना आणि जीवाशी खेळत असल्याच्या प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. हे काम पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

धक्कादायक – कुक्कुटपालन शेडमध्ये केले जाते श्र्वानांचे निर्बीजीकरण

श्वानांचे निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण कार्यक्रमाचा वाडा नगरपंचायतीकडून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेला कामाचा ठेका दिला आहे. हे काम वाडा शहराबाहेरील एका पडित कुक्कुटपालन (पोल्ट्री) शेडमद्ये उघड्यावर सुरु असल्याचे “धक्कादायक” वास्तव समोर आले आहे. डा शहरातील श्वानांना पकडुन या पोल्ट्री शेडमद्ये निर्बीजीकरण केले जात आहे. यासाठी शेडमध्ये वेगवेगळे लाकडी विभाग (पार्टीशन) केले आहेत. अद्यावत शस्त्रक्रिया कक्ष नसल्याने श्र्वानांचे निर्बीजीकरणच उघड्यावर केले जात आहे. त्यामुळे नेमलेली संस्था आणि वाडा नगरप्रशासन श्वानांच्या आरोग्य व जीवाशी खेळत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्याकडुन जागेच्या संदर्भात दिशाभुल करणारी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, निर्बीजीकरण करीत असलेले पोल्ट्री शेड वाडा येथील मिलन पवार यांच्या मालकीचे असुन ११० चौरस फूट असलेल्या या शेडमद्ये यापूर्वी कुक्कुटपालन केले जात होते. मागील तीन वर्षांपासून हा व्यवसाय बंद झाल्याने शेड पडीत होते. ग्रामपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी युनिव्हर्सल संस्थेला हि जागा काही महिन्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शेडची व्यवस्था मध्यस्थामार्फत करून दिली आहे. मात्र याबाबत जागा मालकाशी लेखी करार केला नसल्याने त्याचा आतापर्यंत भाडेपोटी मोबदला देखील मिळाला नाही व शेडमद्ये विद्युत मीटर देखील नसल्याचे जागा मालक मिलन पवार यांनी सांगितले.

मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी या शेडची जागा ही नगरपंचायतीने दिलेली नसुन संस्थेनेच निवडली असल्याचा दावा केला आहे. नगरपंचायतीकडून केवळ युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेला लागणारे कंपाटमेंट, शस्त्रक्रिया विभाग, पाणी, वीज उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. याबाबत निर्बीजीकरणाचे काम बंद व जागे संदर्भात विचारणा करण्यासाठी युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेशी अनेकदा संपर्क साधला असता होवु शकला नाही.

श्वानांच्या आरोग्याला धोका.

श्वानांना ठेवण्यात आलेल्या पोल्ट्री शेडच्या जागेमधील परिसरात कोंबड्यांची विष्ठा पसरली असण्याची शक्यता आहे. निर्बीजीकरणापूर्वी जागा व परिसराचे निर्जंतुकीकरण झाले नसल्यास या विष्ठेतील आरोग्यास हानिकारक जीव जंतूचा श्वानांचे निर्बीजीकरण करताना जंतूसंसर्ग होवुन आरोग्यास धोका संभवतो.

निर्बीजीकरण करताना सोयी- सुविधांचा अभाव व नियमावलीचे उल्लंघन.

श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया यांची नियमावली नुसार नगरपंचायतीकडून मान्यता दिली जाते. त्यानुसार निर्बीजीकरण केंद्राची निर्मिती करताना संस्थेचे तज्ञ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, अधिकारी यांच्यासह सुसज्ज व बंदिस्त शस्त्रक्रिया कक्ष, शस्त्रक्रियेनंतर श्र्वानांना विश्रांतीसाठी पुरेशी व मोकळी जागा, स्वच्छ पाण्याची सुविधा, योग्य आहार, वीज पुरवठा, परिसर स्वच्छतेसाठी निर्जंतुकीकरण साहित्य, वैद्य औषधे, इंजेक्शन, लस, प्राणी रुग्णवाहिका, निर्बीजीकरण केंद्राला फलक असणे यांसह इतर सोयी – सुविधांची उभारणी करणे आवश्यक असते.मात्र या शेडमद्ये उभारण्यात आलेल्या निर्बीजीकरण केंद्रात सोयी- सुविधांची मोठी कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे ॲनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया यांच्या नियमावलीचे उल्लंघन होत तर नाही का? हे पाहणे आवश्यक आहे.

नगरपंचायतीची भूमिका

नगरपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडा शहरातील ५५० च्या आसपास असणाऱ्या श्वानांपैकी १४९ भटक्या श्वानांवर (कुत्र्यांचे) निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण झाले आहे. शासनाने प्रती श्वानाकरिता १,५०० रूपये खर्च नेमून दिलेला आहे. संस्थेला आता पर्यंत झालेल्या कामापोटी १.५० लाख अदा करण्यात आले आहे. काम करणारे संस्थेकडे पुरेसे कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हे काम तात्पुरते थांबले असून लवकरच उर्वरीत काम सुरु केले जाईल अशी माहिती वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी “लोकसत्ता” दिली. त्यामुळे या संस्थेने निर्बीजीकरणाचे काम खरोखरच तात्पुरतेच बंद केले आहे की, कायमचे बंद झाले आहे. असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे ABC कार्यक्रम.

वाडा नगरपंचायतीकडून प्राणी जन्म, नियत्रंण कार्यक्रम (ABC) राबविला जात आहे. ज्यामध्ये श्वानांना पकडणे, निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करून पुन्हा त्याच जागी सोडणे समाविष्ट आहे. श्वानांचे निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण झाल्याचे ओळखण्यासाठी श्वानाच्या कानाला V (व्ही) आकाराची खूण केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचारांसाठी ३ ते ४ दिवस ठेवून त्यानंतर जिथे पकडले आहे, तिथेच सोडले जाते.

नागरिकांकडून व्यक्त होते चिंता

वाडा शहरातील श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने निर्बीजीकरण केलेल्या श्वानांना ओळखता येत नाही. आतापर्यंत १४९ श्र्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाले असले तरी आतापर्यंत कानाला V खुण असलेला एकही श्वान दिसलेला नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

श्वानांचे निर्बीजीकरण शक्यतो उघड्यावर व पोल्ट्री शेडमद्ये करू नये, मात्र श्वानांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागेच निर्जंतुकीकरण करावे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देवुन योग्य उपायोजना कराव्यात. -डॉ.प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पालघर