तरुण शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग, ४० दिवसांत उत्पन्न

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश पाटील

वाडा : वाडा तालुका हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. विविध रंगांचे, आकारांचे कलिंगड उत्पादन करणाऱ्या या तालुक्यात आता काही तरुण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची लागवड वाडा तालुक्यातही करण्याचा निर्णय वाडा तालुक्यातील गारगावमधील प्रयोगशील शेतकरी हितेश पाटील यासह लक्ष्मण राऊत, शांताराम खोडके, भाऊ राऊत, किशोर सोनवणे यांनी घेतला आहे. हे सर्व शेतकरी वर्षांनुवर्षे भातशेती करीत होते. लहरी निसर्गामुळे एखादे वेगळे पीक घेऊन पाहावे, असा विचार करत एक वेगळा प्रयोग म्हणून ही लागवड केल्याचे हे शेतकरी सांगतात.

सेवा सहयोग या संस्थेने या शेतकऱ्यांना पुणे येथे प्रशिक्षण देऊन स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध करून दिली आहेत.  मोजक्याच जागेची मशागत करून मिल्चग पद्धतीने या पिकाची लागवड डिसेंबर महिन्यात करण्यात आली. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्था केल्याने कमी पाण्यात हे पीक घेतले आहे. शेतकऱ्यांनी ३५० ते ९०० रोपांची लागवड केली असून, ४० दिवसांत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले आहे. सेवा सहयोग ही संस्थाच या फळाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी धावपळही करावी लागणार नाही. त्याचबरोबर मध्ये दलाल नसल्याने शेतकऱ्याला योग्य भाव मिळत आहे. उत्पन्न संपल्यावर पुन्हा ही रोपे शेतकरी राखून ठेवणार आहेत, तसेच यंदा हा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढील वर्षी अधिक शेतकरी या प्रयोगात सामील होतील, अशी आशा आहे.

नगदी पिकांकडे वाटचाल

वाडा तालुक्यातील पारंपरिक भात पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्यासाठी काही चांगला पर्याय शोधत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पावसात शेती ओसाड ठेवून पावसाळा संपताच हरभरा, मूग, वाल ही कडधान्य तसेच कलिंगड , खरबूज, स्ट्रॉबेरी आदी नगदी फळांचे पीक घेतले आहे.

सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्यामुळेच आम्ही स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेण्यात यशस्वी ठरलो आहे. 

-हितेश पाटील, प्रयोगशील शेतकरी, गारगाव, ता.वाडा.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strawberry cultivation paddy cultivation farmland ysh