पालघर: जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय तज्ज्ञांच्या रिक्त पदांसाठी मुलाखती सुरू झाल्या असून जिल्ह्यातील विविध केंद्रांमध्ये सिझेरियन प्रसूती करण्याची व्यवस्था कार्यरत करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
करोना काळात बंद करण्यात आलेले आरोग्य पथक पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गर्भवतींची तपासणी, नियमित लसीकरण व इतर वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. आवश्यक औषधे व इतर वस्तू जिल्हा शल्य चिकित्सक विभागामार्फत पुरविण्यात येणार आहेत. पालघर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून रुग्णालयात सर्वसाधारण व सिझेरियन प्रसूती करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील चार परिचारिका वैद्यकीय रजेवर गेल्या असल्याने आरोग्य पथकातील पाच परिचारिकांना हंगामी पद्धतीने ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती विभागात कार्यरत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी दिली. मनोर, कासा, डहाणू, जव्हार व वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वसाधारण व सिझेरियन प्रसूती करण्याची व्यवस्था असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या विविध पदोन्नतीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांची समस्या आरोग्य विभागाला भेडसावत असून ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तज्ज्ञांच्या १५ ते २० जागा रिक्त
स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ या पदांसाठी जिल्ह्यात सुमारे १५ ते २० रिक्त जागा असून त्यासाठी मुलाखती सुरू आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळय़ा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पालघर जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत माहिती देण्यात आली असून या पदांवर कार्यरत अशा तज्ज्ञ मंडळींना चांगले मानधन देण्याची योजना असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
पालघर जिल्ह्य़ातील आरोग्य केंद्राचे बळकटीकरण : वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करणार; ‘सिझेरियन’ व्यवस्था कार्यरत
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय तज्ज्ञांच्या रिक्त पदांसाठी मुलाखती सुरू झाल्या असून जिल्ह्यातील विविध केंद्रांमध्ये सिझेरियन प्रसूती करण्याची व्यवस्था कार्यरत करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-04-2022 at 01:39 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strengthening health centers palghar district appoint medical experts cesarean system working amy