लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये असणारे बेकायदेशीर छेद बंद करणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेत असे सत्ता निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार दरम्यान दिले. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या सर्व आस्थापनाला त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनांचा पार्किंग करण्यासाठी रेष आखून देण्याची देखील त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पदी असल्याने आपल्याला पोलीस एस्कॉर्ट उपलब्ध असताना देखील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी नागमोडी पद्धतीने प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे अवजड वाहने रस्त्याच्या कडेने चालवणे अपेक्षित असताना अशी वाहने मार्गीगेच्या उजव्या बाजूने जात असल्याने ओव्हरटेकिंग डाव्या बाजूनी करावी लागते. यामुळे अनेकदा अपघात होत असून त्यावर तातडीने नियंत्रण आणावे असे पालकमंत्री यांनी पोलिसांना सुचित केले. यास बाबत उत्तर देताना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मार्गिका शिस्त आणण्यासाठी स्वयंचलित दंडात्मक कारवाई यंत्रणा उभारण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून या प्रणालीची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल अशी आश्वासन देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा दर्जा चांगला नसल्याचे पालकमंत्री यांनी जाहीरपणे सांगितले. झालेल्या कामाची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच रस्त्याचे काम परिपूर्ण व समाधानकारक झाल्याशिवाय शासकीय यंत्रणेने त्याचा ताबा घेऊ नये असे पालकमंत्री यांनी बजावले.
राष्ट्रीय महामार्गावर मार्गीका दुभाजकांमध्ये अनेक ठिकाणी अनेक अनधिकृत छेद (कट) असून त्यामुळे अपघात वर असल्या कडे पालकमंत्री यांनी लक्ष वेधले. महामार्ग पोलीस, पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने हे बेकायदेशीर छेद तातडीने बंद करण्याचे पालकमंत्री यांनी सूचना दिल्या.
राष्ट्रीय महामार्गालगत असणारे हॉटेल, व इतर दुकानांमध्ये वाहने उभी करताना ती रस्त्यालगत केली जात असून महामार्गापासून मंजूर असलेल्या अंतरावर अशी वाहन उभी करण्यात यावी यासाठी अशा आस्थापनांच्या बाहेर वाहना उभी करण्यासाठी मर्यादा दर्शवणाऱ्या रेष मारून द्यावी असे देखील पालकमंत्री यांनी सुचित केले.
राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या विविध हॉटेलमधून निघणारा जेवणातील घनकचरा व प्लास्टिक युक्त कचरा जवळच्या ओहळ मध्ये टाकून देत असल्याने पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत पोलीस यंत्रणेने काम करावे असेही त्यांनी सांगितले.
चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेली बकाल परिस्थिती दूर करण्यासाठी शासकीय अधिकारी प्रयत्नशील असताना त्याला सहकार्य करणाऱ्या वेगवेगळ्या हॉटेल व आस्थापनाने पुढाकार घेतल्यास महामार्ग लगतच्या भागाचे सशोभीकरण करणाऱ्या व्यक्तींचा आगामी काळात सत्कार करण्यात येईल असे पालकमंत्री यांनी सांगितले. हॉटेलच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरू नये याबाबत संबंधितांनी दक्षता घेण्याची देखील ते म्हणाले
तर राहील टोल मुक्त दिवस
मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टोल घेतला जात असून महामार्ग लगत असणारे प्लास्टिक युक्त कचरा, राडाराडा, व इतर कचरा उचलण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराची देखील आहे. यापुढे आपण पालघर जिल्ह्यात फिरताना राष्ट्रीय महामार्गालगत प्लास्टिक युक्त कचरा निदर्शनास आल्यास त्या दिवशी वाहन चालकाने टोल भरू नये असे मी स्वतः जाहीर करीन असे गणेश नाईक यांनी सांगितले.