निखिल मेस्त्री
पालघर: अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर विक्रमगडमध्ये शिकलेल्या स्वप्निल माने याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत अखेर यश संपादन केले आहे. देशात त्याने ५७८ वा क्रमांक मिळवला आहे. त्याने सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
मूळचा कोल्हापूरच्या असलेला स्वप्निल मानेने प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथील प्राथमिक विद्यामंदिर भागशाळा नदीकिनारा येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील सिद्धनेर्ली विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या गारगोटी येथून यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल डिप्लोमा ) शिक्षण घेतले. याच क्षेत्रात त्याने पुणे येथील नामांकित शिक्षण संस्थेतून २०१८ मध्ये बी.ई. मेकॅनिकल अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा सराव सुरू केला होता. तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. आर्थिक स्थिती नसल्याने त्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. यादरम्यान विक्रमगड येथील येथील जिजाऊ संस्थेने त्याला मदतीचा हात दिला. नीलेश सांबरे यांनी संस्थेतर्फे स्वप्निलची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. संस्थेतर्फे नि:शुल्क चालवल्या जाणाऱ्या केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या झाडपोली प्रशिक्षण केंद्रात तो चार वर्षांपासून प्रशिक्षण घेत होता.
आई-वडील या दोघांच्या मृत्यूने खचून न जाता घरामध्ये दोन लहान बहिणी, आज्जी आजोबा, पणजी यांचा सांभाळ करत अभ्यासाचा डोलारा सांभाळत परिस्थितीचा बाऊ न करता स्वप्निलने चिकाटीने हे यश संपादन केले आहे. आता तो एक सनदी अधिकारी म्हणून राष्ट्रसेवेत रुजू होणार आहे. या यशामध्ये जिजाऊ संस्थेचे मोठे योगदान असल्याचे स्वप्निलने म्हटले आहे.
अपयश, दु:खाने खचून न जाता यश
पहिल्या दोन प्रयत्नात पूर्वपरीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता स्वप्निलने आपली तयारी चालू ठेवली. दरम्यान वडिलांचे अपघाती निधन झाल्याने त्याच्यासह कुटुंबावर दु:खांचा डोंगर कोसळला. तरीही त्याने करोना काळात पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होऊन मे २०२१ मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये यश संपादन केले.
विक्रमगडमध्ये शिकलेल्या स्वप्निल मानेच्या प्रयत्नांना यश ;केंद्रीय लोकसेवेमध्ये देशात ५७८वा क्रमांक
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर विक्रमगडमध्ये शिकलेल्या स्वप्निल माने याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत अखेर यश संपादन केले आहे.
Written by निखिल मेस्त्री
First published on: 01-06-2022 at 00:01 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success in the endeavors swapnil mane learned vikramgad ranked country central public service amy