पालघर : विविध आजारांवर अत्यंत उपयुक्त अशा औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची  कृषीमंत्र दादा भुसे यांनी येथे सांगितले.

पालघर येथील हुतात्मा स्मारक प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात दादा भुसे बोलत होत. करोना तसेच उद्भवणारे विविध आजारांच्या पाश्र्वाभूमीवर रानभाज्यांचे विशेष महत्त्व आहे. त्याची माहिती व महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ५०० रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.  या रानभाज्यांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल. रानभाज्या जास्त काळ टिकून राहाव्यात यासाठी शीतगृह, कोल्ड ट्रान्सपोर्ट, गोडाऊन उपलब्ध करून देण्यात येईल. रानभाज्यांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट, औषध कंपन्या यांनी पुढाकार घेऊन रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही  यावेळी केले.  महोत्सवांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.  रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासींना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे हा महोत्सवामागील उद्देश होता.

१.१० लाखांची उलाढाल 

रानभाजी महोत्सवात ८२ शेतकरी गट सहभागी  झाले होते. रानभाज्या विक्रीतून   सुमारे १.१० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. या महोत्सवातील प्रदर्शनात रानभाज्यांचे महत्त्व,  ओळखण्याबाबतची माहिती,  पाककृती संदर्भात माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. यावेळी कृषी विभागाने घडी पत्रिकेचे प्रकाशन केले. महोत्सवात कोसबाड कृषी विज्ञान केंद्रासह या भागातील नामांकित नर्सरी तसेच  खाद्यपदार्थांचे स्टॉल  होते.   राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रानभाजी महोत्सवापैकी हा सर्वात मोठा महोत्सव असल्याचा दावा करण्यात येत आहे.