बोईसर : संपूर्ण पालघर जिल्ह्याला सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. धरणांमध्ये या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास सात टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने किमान जून महिन्यापर्यंत पर्यंत शिल्लक पाणीसाठा पुरणार असला तरी पावसाने ओढ दिल्यास गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकते त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालघर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाअंतर्गत धामणी आणि कवडास ही दोन प्रमुख धरणे आहेत. सर्वाधिक २७६.३५ दलघमी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धामणी धरणात सध्या १५३.६५ दलघमी (५२.३६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी या काळात धरणात ४३.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर धामणी धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या कवडास उन्नेयी बंधाऱ्यात आजमितीस ८.३८ दलघमी (४६.५९ टक्के) पाणीसाठा आहे. सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही धरणांत मागील वर्षी याच काळात ४५ टक्के पाणीसाठा म्हणजेच यावर्षीपेक्षा जवळपास सात टक्के कमी पाणीसाठा उरला होता.

सध्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणामधील पाणीसाठा निम्य्यावर आला असून उन्हाळ्यात सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याच्या मागणीत होणारी वाढ व उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणांमधील पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे पुढील काही दिवसात शिल्लक पाणीसाठ्यात झपाट्याने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत पुढील दोन ते अडीच महिने घरगुती, औद्योगिक आणि शेतीला पाणीपुरवठा करताना पालघर पाटबंधारे विभागाला पाण्याचे योग्य रीतीने नियोजन करावे लागणार आहे.

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न :

रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरण प्रकल्पातून डहाणू आणि पालघर तालुक्यातील पाच हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीला सिंचनाचे पाणी पुरविले जाते. पालघर पाटबंधारे विभागामार्फत पिण्यासाठी आणि शेतीला पाणीपुरवठा करताना होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सुरु आहे. सूर्या नदीवरील मासवण बंधारा येथे नवीन झडपा बसवल्यामुळे समुद्रात वाहून जात नासाडी होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. सूर्या डावा तीर आणि उजवा तीर कालव्यांचे अस्तरीकरण आणि बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे पाण्याची होणारी नासाडी रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थानी अंतर्गत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती रोखणे, नागरीकानी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून पाणी बचत करण्याचे आवाहन पालघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी केले आहे.

सूर्या धरण प्रकल्पातून घरगुती २१६ दलघमी आणि औद्योगिक २३ दलघमी असा एकूण २४० दलघमी बिगरसिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर या शहरांसह अदानी औष्णिक वीज प्रकल्प, तारापुर अणूऊर्जा प्रकल्प, भाभा अनुसंधान केंद्र ,तारापुर औद्योगिक क्षेत्र आणि वसई विरार आणि मीरा भाईंदर या मोठ्या महानगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील पालघर पाटबंधारे विभाग अंतर्गत येत असलेल्या मनोर, माहीम केळवा, देवखोप, रायतळी, खांड, मोह्खुर्द या लघूपाट योजनामधील बंधाऱ्यातील पाणीसाठ्यांमध्ये देखील झपाट्याने घट होत असून या बंधाऱ्यामध्ये आजमितीस २४ दलघमी (३५ टक्के) पाणीसाठा उरला आहे. या लहान बंधाऱ्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या गावपाड्यातील शेती आणि आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.धरणांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा :