नीरज राऊत
पालघर : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी व विशिष्ट समुद्रकिनारी परदेशी नागरिकांचा पर्यटनाच्या नावाखाली संशयास्पद वावर होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा निरुपयोगी ठरल्यामुळे जिल्ह्यात अणू व औष्णिक ऊर्जा निर्मिती करणारे महत्त्वाच्या या व इतर प्रकल्पांना भविष्त्त धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना घोलवड पोलीस ठाणेअंतर्गत तोकेपाडा जवळ दोन रशियन नागरिकांनी समुद्रकिनारी राहण्यासाठी तंबू ठोकण्याची घटना घडली होती. पोलिसांनी चौकशी केली असता ही मंडळी वृंदावन येथून मुंबई व मुंबई येथून घोलवड येथे आल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे करमणूक व प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करणे कामी आवश्यक कागदपत्र असल्याचे सांगण्यात आले. यापैकी एका नागरिकाला ताप असल्याने त्याला प्रथम घोलवड प्रथमिक आरोग्य केंद्र व नंतर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या आजारावर नियंत्रण न मिळाल्याने व डॉक्टरांना संशयास्पद वाटल्याने त्याला पुढे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर या दोन परदेशी नागरिकांचा तपशील उपलब्ध झाला नव्हता.
या दोन नागरिकांनी बोर्डीच्या दक्षिणेकडील अविकसित व निर्जन असणाऱ्या टोकेपाडा येथे तंबू का ठोकला होता. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून काही छुप्या पद्धतीने सर्वेक्षण सुरू होते का की धर्मातराच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करण्यासाठी ही मंडळी आली होती असा प्रश्न स्थानिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला होता. घोलवडप्रमाणे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळपासच्या किनाऱ्यात व बोईसर- पालघर परिसरात अनेकदा परदेशी नागरिकांचा बेकायदा वावर होत असल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या होत्या. ही मंडळी नेमकी व्यवसाय, व्यापार किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच पालघर जिल्ह्यात येतात की छुप्या पद्धतीने माहिती संकलित करण्यासाठी त्यांना पाठवले जाते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही वर्षांपूर्वी व करोनाकाळात अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काही परदेशी नागरिकांनी आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण माहिती संकलित करून नंतर ती आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केल्याची घटना घडली होती असे सांगण्यात येते.
अशा परदेशी नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी फॉरेन रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेटर नामक विभाग आहे. मात्र या विभागातील पालघर जिल्ह्यात अधिकारी नसल्याने धोका वाढला आहे. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता परदेशी नागरिकांच्या हालचालीवर देखरेख करण्यात ठेवण्यासाठी पालघर पोलीस तत्पर असल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये यंत्र दुरुस्तीसाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाकडे योग्य परवाना नसल्याने त्याच्या विजा स्थगित करण्यासाठी कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घोलवडमध्ये आलेल्या दोन रशियन नागरिकांकडे योग्य कागदपत्र असल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत वास्तव्य पालघर, डहाणूत भ्रमंती
परदेशातून येणाऱ्या नागरिकांना फॉरेन रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेटर या विभागाकडे त्यांच्या वास्तव्याचे तपशील तसेच ते प्रवास करणार असणाऱ्या ठिकाणांची माहिती आगाऊ देणे अपेक्षित असते. परदेशातून येणारे अनेक नागरिक मुंबई येथे वास्तव्य करत असल्याचे सांगून दिवसभरात पालघर व डहाणू तालुक्यात रेल्वे किंवा विशेष गाडीने प्रवास करताना दिसून येतात. दिवसभरात आपले काम, विशिष्ट निरीक्षण किंवा पाहणी करून ते सायंकाळी पुरत मुंबई येथे पोहोचत असल्याने त्यांच्यावर देखरेख ठेवणे कठीण होत असते. घोलवड येथे आलेले दोन नागरिक हे चक्क पॅसेंजर गाडीतून प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे.