लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : परदेशातून येणाऱ्या रबर टायरचे पायरोलिसिस करून त्यापासून वेगवेगळे घटक उत्पादन करणारे वाडा तालुक्यात सुमारे ७० कारखाने आहेत, परंतु या कारखान्यातून निघणारा धूर आणि धूलिकणांमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारींमुळे या कारखान्यांची तपासणी करून यात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वाडा तालुक्यात ११ गावांमध्ये ७० रबर पायरोलिसिसचे कारखाने आहेत. परदेशातून येणारे टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून कार्बन ब्लॅक, पायरो ऑइल तसेच स्टीलचे उत्पादन घेतले जाते. हे उद्योग केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम व मार्गदर्शक सूचनेनुसार उभारण्यात आले असले तरी हवेत मिसळणारे कार्बन फाइन रोखण्यासाठी आवश्यक स्क्रबर व प्रदूषण नियंत्रक यंत्रणेचा वापर काही कारखान्यांकडून होत नसल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.

श्वसनाचे त्रास, त्वचारोग व इतर आजाराने येथील ग्रामस्थ त्रस्त असून उडणाऱ्या कार्बनकणामुळे शेतीवरदेखील परिणाम झाला आहे. या कारखान्यांमुळे पर्यावरणाला धोकाही निर्माण झाला आहे. याबाबतच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये करण्यात आल्या होत्या.

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे पालकमंत्र्यांनी विचारणा केली असता गेल्या दोन वर्षांत ७० कंपन्यांपैकी ३३ कंपन्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याची कारवाई केली आहे. त्यापैकी पाच उद्योगांनी अटी-शर्ती व नियमांची पूर्तता करून आपले उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. तसेच इतर ११ कंपन्यांना प्रदूषण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठवले आहेत, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.

दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या उद्योगांची पुन्हा नव्याने पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वत: या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या अधिकारात नागरिकांना हानी पोहोचत असल्यास असे उद्योग बंद करण्याचे सूचित केले आहे.

ग्रामस्थांचे आरोप काय?

लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतरावर असण्याच्या नियमाला या कारखान्यांनी बगल दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर वनविभागाची, औद्योगिक सुरक्षा विभागाची तसेच नगररचना विभागाची आवश्यक परवानगी बहुतांश कारखान्यांनी घेतलेली नाही. यामुळे ग्रामस्थांसह भातशेती, कुक्कुटपालन, पाळीव प्राणी यांच्यावर परिणाम होत आहे. परिसरातील झाडांवर तसेच जमिनीवर कार्बन फाइनचा थर पसरल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती देण्यात येते.

रबर टायर पायरोलिसिस म्हणजे काय?

परदेशात वापरलेले रबर टायर विघटन करण्यासाठी त्याचे तुकडे करून ऑक्सिजन विरहित वातावरणामध्ये ५०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये वितळले जाते. त्यामधून पायरो ऑइलनामक इंधन निघते. त्याचा उद्योगक्षेत्रात वापर होतो. याच बरोबरीने काजळीसारखी कार्बन फाइन (भुकटी) पूड तयार होते. यालादेखील मागणी आहे. तसेच टायरमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूच्या तारांमधून निर्मित होणारे धातू नंतर स्टील उद्योगात पुनर्प्रक्रियेसाठी वापरण्यात येते. या वितळवण्याच्या क्रियेत निघणारा वायू हवेत न मिसळण्यासाठी असलेली यंत्रणा प्रभावीपणे न वापरल्यास हा दुर्गंधीयुक्त रासायनिक वायू नागरिकांकरिता हानीकारक ठरतो.

‘एमपीसीबी’ची कारवाईची पद्धत कशी?

प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची पाहणी करून पायरोलिसीस उद्योगाला परवानगी दिली जाते. उत्पादनादरम्यान पाहणी करताना ही यंत्रणा कार्यक्षम पद्धतीने वापरात नसल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रथम उद्योगाला कारणे दाखवा नोटीस नंतर उत्पादन बंद करण्यासाठी प्रस्तावित नोटीस देऊन उद्योगांकडून त्यांचे म्हणणे मागविले जाते. यानंतर उत्पादन बंद करण्यासाठी अंतिम नोटीस देऊन नंतर उत्पादन बंद करण्याची कारवाई केली जाते. यामुळे ही प्रक्रिया राबवण्यास काही महिन्यांचा अवधी लागतो. यात उद्योजक प्रत्यक्षात कारवाईला विलंब होण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसून येतात. उत्पादन बंद केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या अटी-शर्ती व नियमांचे पालन करणारी यंत्रणा उभारल्याचे दाखवावे लागते. त्यानंतर उत्पादनास परवानगी दिली जाते.

बाधित गावे

टायर्सवर प्रक्रिया करणारे ५२ कारखाने वाडा तालुक्यात आहेत. उसर, दिनकरपाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोन, कोनसई अशा गावांमध्ये हे कारखाने कार्यरत आहेत.