मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवार २० मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता दरम्यान विवळवेढे आणि धानीवरी गावाच्या मध्ये गुजरात मार्गिकेवर धागे धुण्याच्या केमर्ट (chemart) नामक ऑईलच्या टाक्या वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे ट्रक मधील ऑईल महामार्गावर पसरले असून यावरून दुचाकी स्वारांना प्रवास करणे अवघड झाले आहे.
हेही वाचा >>> अनाकलनीय हत्येचा पालघर पोलिसांकडून उलगडा; लोणावळा येथे फिरायला नेतो सांगून मोखाडा येथे केली होती हत्या
मुंबई कडून गुजरात कडे निघालेल्या ट्रकला आंतरिक बिघाडामुळे अचानक आग लागली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेत चालक उतरल्यामुळे त्याला कोणतीही इजा झालेली नाही. आगीच्या घटनेमुळे साधारण दोन तास दोनही मार्गीकेवर मोठी वाहतूक कोंडी होऊन जवळपास सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा >>> पालघरमध्ये अद्याप एकही उमदेवार घोषित नाही, बविआच्या निर्णयाकडे सार्यांचे लक्ष
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरत आग विझवण्यासाठी अग्निशामक दलांना पाचारण केले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले असून यामध्ये ट्रक जळून खाक झाला आहे. आगीमध्ये ट्रकची चाके फुटून लांब उडाल्याने नजीकच्या जंगलाला सुद्धा आग लागून काही प्रमाण गवत जळाले आहे. साधारण एका तासाने डहाणू नगरपरिषद आणि अदानी थर्मल पॉवर स्टेशन डहाणू येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून दोनही मार्गिकेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.