वाडा : मुंबईची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे. या प्रकल्पाचे संपुर्ण सर्वेक्षण झाले असुन विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबियांनाही सद्यस्थितीत असलेल्या घराची किंमत, जमीनीची किंमत, फळझाडाची किंमत कशा प्रकारे द्यायचे निश्चित करण्यात आले. मात्र या प्रकल्पासाठी या परिसरातील जंगलातील व अभयारण्यातील सुमारे साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असुन यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात पैसे मोजून अन्य जिल्ह्यांत जागा खरेदी करुन त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासित केले आहे.
वाडा तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने गेल्या दोन वर्षांपासून सर्व्हेक्षण केले आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणारी सहा गावे व १२ पाडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी वाडा तालुक्यातीच वनविभागाची जागा बघण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खाजगी मालकीची जमीन, झाडे व घरांच्या किंमतीचे दर बाधितांना देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पात अडसर ठरणारी साडे चार लाख झाडे तोडली जाणार आहेत. या झाडांच्या बदलात अन्य जिल्ह्यांत तोडल्या जाणा-या झाडांच्या बदलात तीन पटीने अधिक झाडे लावण्यात येणार असल्याचे प्रयोजनही महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे. या तोडण्यात येणाऱ्या झाडांची ओळख पटावी म्हणून अजून पर्यंत सुमारे दोन लाख झाडांवर क्रमांकन (छापणी) चे काम पूर्ण झाले आहे. गेले अनेक वर्ष तानसा अभयारण्य मुळे परिसरात अनेक निर्बंध लादले गेले असताना त्याचा फटका स्थानिकांना बसला होता. मात्र या पाणी प्रकल्पामुळे वृक्षतोड होता ना गेली अनेक वर्ष राखली गेलेले हे जंगल बोडके होईल याकडे स्थानिक लक्ष वेधक आहेत.
हेही वाचा : अवकाळी पावसाचा पालघर जिल्ह्याला फटका; ५४८ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुक्या मासळीचे नुकसान
तानसा वन्यजीव अभयारण्य लगत हा प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पात साडेचार लाख झाडे बुडित क्षेत्रात येत असल्याने आधी या झाडांच्या बदलात तीन पटीने अन्य ठिकाणी झाडे लावण्यात आली तरच वन विभाग या प्रकल्पातील झाडे तोडण्यास परवानगी देणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
गारगाई प्रकल्पामुळे जवळपास एक हजार कुटुंब विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणारी सर्व कुटुंबे ही आदिवासी समाजाची आहेत. या प्रकल्प क्षेत्रात येणारी खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. व तशा प्रकारच्या नोटीसा शेतक-यांना देऊन जमीन संपादनाबाबत विविध वर्तमान पत्रातून मुंबई महानगर पालिकेनी जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत. असे असतानाही या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, वनविभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींचे एकमत झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम
गारगाई धरणातून होणारा पाणी पुरवठा
मुंबईला दररोज 440 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या सहा महसूल गावांसह १० ते १२ पाड्यांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील आमले हे एकमेव गाव विस्थापित होणार आहे.
११०० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात
या प्रकल्पामुळे एकुण ११०० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात येणार असून यामधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने या धरणाचा मोठा फटका तानसा अभयारण्याला बसणार आहे.
वृक्ष संपदेवर कुऱ्हाड
६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या धरणाचे पाणी या धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मोडकसागर या धरणात बोगद्याद्वारे गुरुत्वीय पद्धतीने आणले जाणार आहे. या धरणामुळे मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील बुडीत क्षेत्रात येणारी साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड बसणार आहे.
“गारगाई प्रकल्पात चार लाखांपेक्षा जास्त झाडे जातात, यामधील काही झाडांची छापणी महापालिकेने केलीली आहे. मात्र ही झाडे तोडण्यासंदर्भात महापालिकेकडून वन्यजीव विभागाकडे आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही.” – अक्षय गजभिजे, उप वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, ठाणे.