वेतन कपातीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा : प्रचलित निवृत्तिवेतन योजना १ नोव्हेंबर २००५ नंतर बंद करून या वर्षी १ मार्चपासून जिल्हा परिषद पालघरच्या शिक्षकांना एनपीएस (राष्ट्रीय निवृत्तिवेतन) ही योजना लागू करण्यात आली. शिक्षकांनी या योजनेंतर्गत खाते उघडले आहे. नियमांनुसार मे पासून मूळ वेतनातून प्रति महिना १० टक्के रक्कम कपातही सुरू झाली आहे. परंतु पाच महिने उलटूनही शिक्षकांच्या या खात्यांमध्ये अजूनही ही रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे मिळणाऱ्या लाभापासून शिक्षक वंचित राहिले आहेत.

शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली प्रचलित निवृत्तिवेतन योजना १ नोव्हेंबर २००५ नंतर बंद करून नवीन पारिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार २०१४ पर्यंत जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वेतनातून शिक्षकांच्या वेतनातून दरमहा १० टक्के  रक्कम कपात करण्यात येत होती, परंतु त्याचा कुठलाही हिशोब शिक्षकांना  अद्यापही देण्यात आलेला नाही. त्यामुळे २०१५ मध्ये बहुतांश शिक्षकांनी या योजनेत होणारी कपात थांबवली होती. या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी जुनी अंशदायी पेन्शन योजना (निवृत्तिवेतन)बंद करत या योजनेचा समावेश ‘एनपीएस’ योजनेमध्ये करण्यात आला. ही योजना पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीची असल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली. 

शिक्षकांनी या वर्षी म्हणजे मार्च, एप्रिल या महिन्यांत या योजनेंतर्गत खाते उघडले. मे पासून शिक्षकांच्या वेतनातून पुन्हा एकदा प्रत्येक महिन्याला १० टक्के रक्कम कपात सुरू झाली. पाच महिने झाले तरी अद्याप या खात्यामध्ये जिल्हा परिषदेने एक रुपयाही जमा केलेला नाही.  ही योजना भांडवली बाजार योजनेशी संलग्न आहे. जितक्या उशिराने रक्कम जमा होईल तेवढा त्याचा लाभ कमी मिळणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिक्षकाकडून लवकरात लवकर ही रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी केली जात आहे.