पालघर : राज्यभरातील शिक्षक संघटनांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, २०२४ चा शासन निर्णय रद्द करणे, संच मान्यतेत बदल करणे यासह अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता आपण लवकरच शिक्षक संघटना व शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेऊ. उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षक लोकशाही आघाडीचे पालकत्व स्वीकारल्यामुळे महिन्याभरातच शिक्षकांच्या समस्यांचे निरसन होईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना दिला.
पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन २०२५ पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमंत सावरा, आमदार एड. निरंजन डावखरे, महाराष्ट्र शिक्षण लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष नरसू पाटील, प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी तर दुपारच्या सत्रात उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजेंद्र गावित व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये माध्यमिक व प्राथमिक हे दोनच घटक देशभक्ती निर्माण करू शकतात. राष्ट्रभक्ती जगवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे याचे भान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. म्हणून देशभक्ती मुलांमध्ये रुजू करायची असेल तर त्या शिक्षकाला अशैक्षणिक काम देऊ नये असे उद्गार उद्योगमंत्री यांनी काढले. शिक्षक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी लढा देत असून एकदा घेतलेला निर्णय हा चिरकाळ टिकला पाहिजे. यामध्ये बदल करू नये तरच आपल्या मागण्या मान्य होतील असा सल्ला त्यांनी शिक्षक आघाडीला दिला.
शिक्षकांच्या मनात असलेल्या अनेक शंका अडचणी व समस्यांचे निरसन करण्यासाठी आपण शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत शिक्षक संघटनांची लवकरच बैठक घेऊ. उपमुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही समस्या मांडल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आता माझी असून मांडलेल्या अडचणी पुढील महिन्यापर्यंत सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी शिक्षकांना दिला.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये सामान्य विद्यार्थ्याला ताकद देण्याची जबाबदारी असून सर्वात चांगले विद्यार्थी हे शिक्षक आघाडीच्या माध्यमातून घडले आहेत. शिक्षक आघाडीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडणार असून ही फक्त माझी जबाबदारी नसून प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे असे वक्तव्य उदय सामंत यांनी यावेळी केले.
जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्रतस्थ संस्थांचा सत्कार जीवनगौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. उद्योग मंत्री यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करताना शिक्षकांनी एकच गोंधळ केल्यामुळे जवळपास पंधरा पुरस्कारांचे वितरण पूर्ण केल्यानंतर मंत्री महोदयांनी प्रस्थान केले व त्यानंतर इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
हेलिकॉप्टर चुकीच्या हेलीपॅडवर उतरले
शिक्षक अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री येणार या अनुषंगाने पोलीस परेड येथील सिडको मैदानाच्या एका हेलिपॅडवर तयारी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री गेल्यानंतर दीड तासानंतर पालघर येथे आगमन झालेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर ठरविलेल्या हेलीपॅडवर न उतरता दुसऱ्या हेलिपॅडवर उतरल्यामुळे पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ उडाली.