नीरज राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) या मत्स्य प्रजातीचे जतन होण्याच्या दृष्टीने खवय्यांमध्ये विशेष मागणी असणाऱ्या या माशाला राज्य सरकारने राज्य माशाचा दर्जा दिला असून त्या दृष्टीने उपाययोजना सुचवण्यासाठी तांत्रिक अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतला आहे

८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात राज्य मासा (सिल्वर पोम्प्लेट) पापलेट या मस्य प्रजातीचे अधिवास सुधारणे, प्रजनन कालावधी व क्षेत्र इत्यादीचा अभ्यास करून संवर्धन व संरक्षण करण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबत सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान माशांच्या मासेमारीला आळा घालणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या महत्वपूर्ण गरजेबद्दल जागरूकता वाढवणे याबाबत उपाययोजना करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

हेही वाचा >>> डहाणूत मुद्रांक विक्री मध्ये अनियमितता प्रकरणी एका विक्रेत्याचा परवाना निलंबित

या समितीमध्ये केंद्रीय सागरी मत्स्यकी अनुसंधान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक, केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (मुंबई) मत्स्य विद्यालय (रत्नागिरी), कांदळवन कक्ष (राज्य शासन) यांचे प्रतिनिधी तसेच मत्स्यव्यवसाय (सागरी) विभागाचे सहआयुक्त, प्रादेशिक उपायुक्त यांना सदस्य म्हणून तर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्य आयुक्त सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. पापलेट माशाच्या प्रजनन कालावधी व क्षेत्र इत्यादीचा अभ्यास करून संवर्धन व संरक्षण करणे, डोल जाळ्याच्या खोलाच्या भागातील आसाचा आकार, दालदी जाळ्याचा आसाचा आकार याबाबत नियमन करणे तसेच डोल व दालदी या दोन्ही जाळ्यांची व नवख्यांची संख्या निश्चित करणे, लहान आकाराच्या पापलेटची मासेमारी व विक्रीवर नियंत्रण करणे, संवर्धना संदर्भात जनजागृती कार्यक्रम राबवणे तसेच भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करून सिल्वर पापलेट हा मासा भौगोलिक मानांकन प्राप्त होण्यासाठी आवश्यक अभ्यास करून अहवाल सादर करणे असे या समितीच्या कार्यकक्षा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical committee formed for the conservation of promfret zws