पालघर: शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषदेतर्फे लाखो रुपयांचा निधी श्वान निर्बीजीकरणासाठी खर्च होत असूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसते. सोमवारी श्वानांनी तब्बल २०जणांना दंश केला तर महिन्याभरात १७६ नागरिकांना श्वानदंश झाला आहे.
पालघर शहरात सध्या भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल १७६जणांना श्वान चावल्याच्या घटना घडल्या. सोमवारच्या एका दिवसात २०जणांना हे भटके श्वान चावल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यातील निर्मला जैन या ८०वर्षीय वृद्धेवर श्वानांनी जीवघेणा हल्ला केला. त्यात त्या जबर जखमी होऊन जवळपास वीस टाके घालावे लागले, एवढी खोल जखम झाली होती. भररस्त्यात भटक्या श्वानांचा घोळका मुक्त संचार करत असतो. नागरिकांमध्ये त्यांची दहशत माजली आहे.
नगरपालिका एकीकडे म्हणते आहे की, श्वान निर्बीजीकरणासाठी अनेक योजना राबवत आहोत. या योजनेपोटी लाखो खर्चही झालेले आहेत, परंतु नागरिक म्हणतात की वर्षभरात श्वान पकडणारे एकही वाहन दिसलेले नाही. त्यामुळेच श्वानांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पालघर-माहीम रस्त्यावर सर्वाधिक श्वान दिसून येतात. कधीकधी एकटय़ादुकटय़ा नागरिकांच्या मागे हे श्वान लागतात. त्यांच्यावर ओरडून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते नागरिकांना चावे घेतात. दररोज रुग्णालयात श्वानदंशाचे ५-६रुग्ण दाखल होताना दिसतात. लहान मुले आणि वृद्धांवर श्वान मोठय़ा प्रमाणात हल्ले करत असल्याचे दिसते.
पालिकेचे दुर्लक्ष
एक एप्रिल ते दहा एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत ७०जणांना श्वानदंश झाला होता. त्यातील ५ एप्रिलला तब्बल १४जणांना श्वानांनी जखमी केले. पुढे ११ ते २० एप्रिल या कालावधीत सातजणांना श्वानदंश झाला. त्यात १८एप्रिल या दिवशी १३जणांना श्वान चावले होते. २१एप्रिलला ९जण श्वानदंशाने घायाळ झाले तर २२ आणि २३ एप्रिलला प्रत्येकी सात जणांना श्वानदंश झाला होता. २० आणि २६ एप्रिलला चार व्यक्तींना श्वान चावल्याच्या घटना उघडकीस आल्या. श्वानसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना, पालिकेकडे ही संख्या नियंत्रित करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही. जवळपास दोनशेजणांना श्वानांनी चावा घेतल्यानंतरही पालिकेचे डोळे उघडत नाहीत का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. श्वान निर्बीजीकरणासाठी पालिकेकडे मोठा निधी येतो. श्वानांना जाळय़ात पकडून बंदिस्त करण्यासाठी गाडीची व्यवस्थाही आहे, मात्र तिचा वापर होताना दिसतच नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
पालघरमध्ये भटक्या श्वानांची दहशत; महिन्याभरात १७६ जणांना श्वानदंश
शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषदेतर्फे लाखो रुपयांचा निधी श्वान निर्बीजीकरणासाठी खर्च होत असूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसते.
Written by अक्षय येझरकर
First published on: 28-04-2022 at 01:55 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror stray dogs palghar 176 people bitten dogs one month amy