पालघर : सर्वत्र किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी वाट खडतर झाल्याने पर्यटक येथे पाठ फिरवतो की काय अशी भीती पर्यटन व्यवसायिकांमधून निर्माण होऊ लागली आहे. पुल नाका, शितलाई मंदिर ते केळवे बाजार या दोन्ही रस्त्यावर तर खड्डय़ातच रस्ता गेल्याचे दिसते. या खड्डय़ांमुळे त्याचा परिणाम जाणवून येत आहे.
केळवेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात गावाच्या सुरुवातीपासूनच खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने पर्यटकांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी केळवे ऐवजी पर्यटक इतर किनाऱ्याकडे वळू लागले आहेत व पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे.
केळवे हे मुंबई-गुजरातपासून जवळचे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. शिवाय स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा, नारळी – पोफळीची झाडे, सर्वत्र हिरवाई परिसर असल्याने हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. ताजे मासे, स्थानिक विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, राहण्याची उत्तम सोय, समुद्र सफर आदी प्रकारच्या सुविधांमुळे पर्यटकांची किनाऱ्यावर नेहमीच गर्दी असते. मात्र अलीकडल्या काळात येथील रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे प्रवासी वाहने, खासगी वाहने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे केळवे येथे येणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना जिकरीचे होऊन बसले व प्रवास त्रासदायक झाल्यानेही ते हैराण आहेत. रस्त्याची झालेली दुरवस्था ह्याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. पर्यटकांनी केळवे गावात प्रवेश करतानाच पूल नाक्यावरून शीतलाई मंदिर जवळ जाणारा संपूर्ण रस्ता उखडून गेला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहे. दुसरीकडे शितलादेवी एसटी स्टॉप ते केळवे बाजार हा रस्ताही पूर्ण खराब झाला आहे. पर्यटकच नव्हे तर दररोज कामानिमित्त प्रवास करणारे चाकरमानी याच बरोबरीने या भागातील शेतकरी विद्यार्थी यांनाही या खड्डेमुळे रस्त्यातून प्रवास करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था असून तो तातडीने दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होण्याची भीती आहे. गावातील नागरिक व पर्यटक यांना खराब रस्त्यामुळे अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. तातडीने रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी आहे. -संजय घरत, सचिव, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ.