पालघर व माहीम दरम्यान वाहणाऱ्या पानेरी ओहळा मध्ये रासायनिक सांडपाणी अथवा रसायन मिसळल्याने संपूर्ण ओहळातील पाणी तपकिरी रंगाचे झाले आहे. या ओहळावर अवलंबून असणाऱ्या बागायतदार व वडराई खाडीकिनारी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.केळवे रोड येथून उगम होणाऱ्या या पानेरी ओहळ हा पिडको औद्योगिक वसाहत व पुढे पालघर नगरपरिषद, माहीम गावातून वाहून वडराई येथे समुद्राला मिळतो. या ओहळावर माहीम परिसरातील अनेक बागायतदार मार्च महिन्यापर्यंत अवलंबून राहत असून भाजीपाला मिरची, काकडी, कारली इत्यादी लागवड करीत असतात. शिवाय खाडी परिसरात या ओहळात असणाऱ्या लहान मासांवर अनेक मच्छीमार बांधव आपली उपजीविका करत असतात.
माहीम (रेवाळे) येथील प्रतीक वर्तक हे आज सायंकाळी घरी परतत असताना पाणेरी मधील पाण्याचा रंग बदलण्याचे त्यांना आढळून आले. या संदर्भात माहीम येथून अनेका नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मुंबई येथे कार्यालयीन कामकाजासाठी गेल्याचे सांगण्यात आले. पिडको औद्योगिक वसाहती मधील एखाद्या उद्योगाने रंग (डाय) अथवा रासायनिक घनकचरा अथवा सांडपाणी ओहळात सोडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे संपूर्ण ओव्हाळातील जैवविविधता नष्ट झाली असावी असे माहीम येथील ग्रामस्थांनी शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>>‘बुलेट ट्रेन’मुळे जंगल दुरावले, विकासापासूनही वंचित
पणेरी ओहळातील प्रदूषणाच्या विरुद्ध ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला असून पणेरी बचाव संघर्ष समिती व त्यापूर्वी ग्रामस्थांनी अनेक आंदोलन केली आहेत. असे असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा प्रशासनाकडून पालघर येथील उद्योगांमधील प्रदूषण रोखण्याकडे कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ओहळ पात्रातील पाण्याचे नमुने तातडीने घेण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले. तसेच मुंबई येथे कार्यालयात असल्याने या ठिकाणी आपण स्वतः उद्या सकाळी पाहणी करू असे त्यांनी लोकसत्तेला सांगितले.