पालघर/ वसई: विरार येथील परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक कार्यालयातील कामकाज ९ जूनपासून मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात दररोज वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी ७० वाहने, १४४ पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी, परवानाविषयक कामकाज व इतर कामांचा समावेश आहे.
परिवहन आयुक्त कार्यालय यांचे कडून ७ जून रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या प्रमाणात मर्यादित स्वरूपात शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत देणे इत्यादी तसेच वाहन हस्तांतरण वाहनास नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, कर्ज बोजा चढविणे – उतरविणे इत्यादी कामकाज तसेच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व परवानाविषयक कामकाज हे मर्यादित स्वरूपात ९ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये २५ अवजड वाहनांसह सत्तर वाहनांची प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे.
या सर्व कामकाजाकरिता दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आलेला असून अर्जदारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्जदारांनी ज्या दिनांकाची भेटीची वेळ घेतलेली असेल त्याच दिवशी कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अर्पॉटमेंट घेतली नाही त्यांनी कार्यालयात विनाकारण गर्दी करू नये तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व अर्जदारांनी करोनाप्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.