लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या विविध राष्ट्रीय प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षात अमुलाग्र बदल होईल तसेच येथील नागरिकांचा जीवनमान उंचावेल असे प्रतिपादन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. वाढवण बंदराला परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असेही ते म्हणाले.

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोकण आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, आमदार राजेंद्र गावित तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा परिचय ते भिवंडीचे प्रांत अधिकारी असल्यापासून होता असे सांगत नागरिकांच्या प्रती आपुलकीची भावना त्यांच्यामध्ये असल्याचे आपण त्यावेळी पासून हेरले होते. गेल्या अनेक वर्षात आपल्या सोबत त्यांनी काम करताना नागरिकांच्या प्रश्नांना महत्त्व दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

वाढवण येथील बंदरासोबत पालघर (माहीम) येथे जगातील सर्वात मोठा यान उत्पादन करणारे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असून त्याविषयी नागरिकांमध्ये असणारा असंतोष दूर करून त्यांच्या मनात गौरवाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे गणेश नाईक म्हणाले. पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाची उंची वाढणार नसेल तर आपण प्रकल्पासोबत राहणार नाही असे सांगत गणेश नाईक यांनी जिल्ह्यात पुढील पाच वर्षात अमुलाग्र बदल होतील असे प्रतिपादन केले.

लोकशाहीच्या चारही खांबांना कमी अधिक प्रमाणात कीड लागली असली तरी या काही प्रमाणात असणाऱ्या चांगल्या व्यक्तींमुळे लोकशाही अजूनही जिवंत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. राजकारण हे काही खराब क्षेत्र नसले तरीही त्यामधील अनेक मंडळी डागाळली असल्याने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगितले. गोविंद बोडके प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताना त्यांनी कदापि राजकारणात येऊ नये असा सल्ला गणेश नाईक यांनी दिला.

राष्ट्रीय महामार्गाबद्दल नाराजी

दिवसभराच्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीट करण्याच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या पालकमंत्री यांनी निरोप समारंभात राष्ट्रीय महामार्गावर सुसज्ज रुग्णवाहिका हवी, चांगल्या दर्जाचे शौचालय हवेत तसेच दुभाजकांच्या ठिकाणी लावलेल्या झाडांना चांगल्या प्रकारे पाणी देऊन ही झाडे फुलवली पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. महामार्गावर स्वच्छता राखण्यास संबंधित ठेकेदार कंपनी अपयशी ठरल्यास आपण त्या दिवशी साठी टोलमुक्ती चा आदेश जारी करू असे गणेश नाईक यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांना भावपूर्ण निरोप

महसूल विभागाने आयोजित निरोप समारंभ तब्बल चार तासांपेक्षा अधिक वेळ सुरू राहिला. याप्रसंगी अनेक आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोविंद बोडके यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभवांचे कथन केले. नंतर त्याला पोलिसांच्या परेड जीप मधून अधिकारी वर्गाने मानवंदना देत घरात पर्यंत निरोप दिला.

सत्काराला उत्तर देताना गोविंद बोडके यांनी आपल्याला आपल्या कारकीर्दीत दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगत त्यांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.