बोईसर : तारापूर जवळ असलेल्या कुडण या गावातील तलावातील हजारो मासे मृत झाल्याचे आज सकाळी आढळून आले आहे.तारापूर जवळील कुडण ग्रामपंचायत हद्दीतील माळी स्टॉप जवळील तलावातील हजारो मासे मृत झाल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. सकाळी तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या एका स्थानिक पक्षी निरीक्षकाला तलावामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे प्रथम आढळून आले.

या परिसरात औद्योगिक सांडपाणी नसताना तलावातील हजारो माशांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अस्पष्ट आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मासे आणि तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.

सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे तलावाच्या पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे (डिसॉल्वड ऑक्सिजन) प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा विषबाधेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत तलावाची पाहणी करून माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. मृत माशांना स्थानिक भाषेत खवल्या असे संबोधले जात असून अशा माशांचा कुडण तलावाच्या किनाऱ्यावर खच पडल्याचे दिसून आले आहे.

Story img Loader