पालघर : डहाणू तालुक्यातील कंक्राडी नदीवर असलेली तीन धरणे गेल्या २० वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. निधी अभावी त्यांची दुरुस्ती रखडली असून ही बाब डहाणू शहर जलमय होण्यास, सखल भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. धरणांची दुरुस्ती करणे, त्या ठिकाणी साचलेली माती व गाळ उपसण्याचे काम पूर्ण झाल्यास डहाणू शहराला पावसाळय़ात साचणाऱ्या पाण्यापासून सुटका होईल याकडे सोसायटीस फोर फास्ट जस्टीस या डहाणूतील संस्थेने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाफेवरील रेल्वे इंजिनला नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता भारतीय रेल्वेने डहाणू रेल्वे स्थानकापासून सुमारे १६ किलोमीटर लांब असणाऱ्या कैनाड या गावी तीन धरणे बांधली होती. या धरणातून साठवलेले पाणी टँकरद्वारे आणून इंजिनला पुरवठा करण्यात येत असे. वाफेवरची इंजिन बंद झाल्यानंतर या धरणांची देखरेख व डागडुजी रेल्वेने केली नाही. सन २००२ मध्ये डहाणू परिसरात झालेल्या ढगफुटीमध्ये या धरणांच्या बाजूची जमीन वाहून गेली परिणामी धरणातील पाणी साठवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली.

डहाणूच्या पूर्वेकडील डोंगरी भागात होणाऱ्या पावसाचे पाणी याच धरणांच्या भागातून कंक्राडी नदीमध्ये मिसळत असून उतारामुळे पाण्याला अधिक गती प्राप्त होते. त्यामुळे पावसाळय़ात हे पाणी डहाणू शहरातील इराणी रोड, स्टेट बँक परिसर, केटी नगर, एसटी स्टँड परिसर, प्रभू पाडा परिसरात शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असते. या धरणांच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक वर्षे उत्सुकता दाखवली नाही. स्थानिक ग्रामपंचायतीने दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असता कंक्राडी ग्रामपंचायतीने रेल्वेची मालकी व उभारलेले धरणाचे बांधकाम अबाधित ठेवून दुरुस्ती करण्यास हरकत नसल्याचे सप्टेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेचे तत्कालीन विभागीय अधिकारी यांनी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस तत्कालीन अध्यक्ष संतोष शेट्टी यांना कळविले होते. मात्र या कामासाठी काही कोटी रुपयांचा निधी लागणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे त्याची तरतूद नसल्याने काम रखडले आहे.

डहाणू शहराला पुराच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी या धरणांच्या लगत पुन्हा नव्याने उभारणी करून धरणात साचलेला गाळ, दगड व मातीचे उत्खनन करून धरणामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी यासाठी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस या संस्थेने जलसंधारण विभाग अथवा जिल्हा परिषदेने या प्रकल्पाकडे गांभीर्याने व अग्रक्रमाने लक्ष देण्याची विनंती केली आहे. या संदर्भात स्थानीय लोकप्रतिनिधी देखील पाचारण करण्यात आले आहे.

जलस्रोताचे पाणी मचूळ
सध्या कंक्राडी नदीतून समुद्राचे पाणी रेल्वे पुलाच्या पलीकडे पोहोचत असून डहाणूच्या पूर्वेकडील असणाऱ्या अनेक गावांमध्ये पावसाळय़ानंतर पाणी क्षारयुक्त होत असून ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल यापूर्वी देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत डहाणू खाडीतील समुद्री पाण्यामुळे डहाणू शहरात इराणी रोड व वाकी परिसरातील अनेक पाणी स्रोतांचे पाणी मचूळ झाले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच पाण्याच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी कैनाड येथील धरणाची दुरुस्ती करणे अत्यावश्यक झाले असून शासकीय योजना या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three dams on the kankradi river have been broken for 20 years and are awaiting funding amy