डहाणू : पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे धामणी धरणात ११२ मी. पाणीसाठा झाला आहे. ३१ जुलै अखेपर्यंत धरणात संचय पातळी तलांक ११३.६० मी.पर्यंत नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. धरणात ११३.६० मी तलांकावर पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुढील २४ तासांत धामणी धरणाचे वक्राकार दरवाजा क्र. १, ३ व ५ उघडुन पाण्याचा विसर्ग सुर्या नदीत सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सुर्या पाटबंधारे विभागाने कळवले आहे.त्यामुळे सुर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठ परिसरातील रहिवासी भयभीत
डहाणू शहरात जलाराम मंदिर बाजूच्या रहिवासी वस्तीत घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील सर्व साहित्य हलवावे लागले. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. कंक्राडी नदीवरील रेल्वे पुलाच्या बोगद्यात पाणी भरल्याने वाहतुकीचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे रहिवाशांना दुसऱ्या मार्गाने शहराशी संपर्क करावा लागला. नदीलगत झोपडपट्टी परिसरात पाणी तुंबल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. डहाणू इराणी रोड, येथील सखल भागांतही पाणी तुंबले होते. येथील काही चाळींमध्ये पाणी शिरल्याने तळमजला बुडाला होता. या उपनगरांमध्ये पावसाच्या सरी बरसल्याने पाणीच पाणी होते. पावसाचा मोठा फटका पश्चिम रेल्वेला बसला. अनेक ठिकाणी रेल्वे पूल पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूकही काहीशी संथ गतीने सुरू होती. वधना येथील
सुसरी नदीवरील पूल बसल्याने पाच गावांचा संपर्क तुटला होता. मोठे रस्तेही पाण्याखाली गेल्याने त्यांचा मोठा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला होता. काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले होते. दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी झाडे पडून किरकोळ दुर्घटनाही घडल्या आहेत. सफाळे गेरूच्या ओहळजवळ तसेच हायस्कूलसमोर रस्त्यावरून पूर वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच माकुणसार येथेही मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने पालघरला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
मेंढवण चार दिवसांपासून अंधारात
सोमटा येथे विजेचे चार खांब कोसळून पडल्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या आहेत. वीज वितरण कंपनीकडून त्याची द्दुरुस्ती झाली नसल्याने मेंढवण गाव चार दिवसांपासून अंधारात चाचपडत आहेत. मेंढवण हा जंगल भाग असल्याने रात्री अपरात्री जंगली श्वापदे फिरत असल्याने इजा होण्याची भीती आहे. वीज नसल्याने वीज उपकरणे, मोबाइल बंद असल्याने रहिवासी संपर्काबाहेर गेले आहेत. डहाणू गजाड, आशागड, सायवन, धुंडलवाडी मोडगाव,येथील रहिवासी भागाला विद्युतपुरवठा करणाऱ्या फिडरमध्ये मोठा बिघाड झाल्याने विजेचा फटका अनेक भागांना बसला. त्यामुळे अधिकारी व लाइनमन यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. अशाप्रकारे दुपारपासून रात्रीपर्यंत सुमारे आठ-नऊ तास विजेचा लंपडाव सुरू होता.