तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णालयात आणखी ५० खाटा

पालघर: गेल्या सव्वा वर्षांपासून पालघर परिसरातील गंभीर करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यरत असणारे बोईसर येथील टिमा रुग्णालय उद्या (१ जून) पासून नूतनीकरणाच्या कामासाठी तात्पुरते बंद राहणार आहे. या रुग्णालयात करोनाबाधित गर्भवती महिलांवर उपचार, त्यांची प्रसूती व बालरोग विभाग उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या करोना लाटेच्या अनुषंगाने या रुग्णालयात ५० अतिरिक्त खाटांची सुविधा करण्यात येणार आहे.

मार्च २०२० मध्ये गंभीर असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी हे समर्पित करोना रुग्णालय कार्यरत करण्यात आले होते. या रुग्णालयात आजवर ८९७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णालयाची क्षमता वीस वरून तीस खाटांवर वाढविण्यात आली होती तसेच या ठिकाणी अतिदक्षता विभाग व व्हेंटीलेटर खाटाची सुविधा उपलब्ध होती.

या रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर गर्भवती महिलांसाठी तसेच लहान मुलांवर करोना उपचार करण्यासाठी विस्तार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला आहे. तारापूर परिसरातील काही उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा खर्च केला जाणार आहे.

आगामी महिनाभराच्या काळात प्राणवायूची सुविधा असणाऱ्या ५० अतिरिक्त खाटा उभारण्यासाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. या कामाला गती मिळावी त्यादृष्टीने १ जूनपासून या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करण्याचे बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

या रुग्णालयात असलेले ऑपरेशन थिएटर व इतर विभाग अद्ययावत करून तिसऱ्या करोना लाटेसाठी हे रुग्णालय सज्ज करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा नूतनीकरण प्रकल्प हाती घेतला आहे.

‘कॅम्लीन’तर्फे प्राणवायू प्रकल्प भेट

  • करोनाच्या रुग्णांसाठी प्राणवायूचा तुटवडा जाणवत असताना प्रधानमंत्री कार्यालयाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन तारापूर येथील ‘कोकुयो कॅम्लिन लिमिटेड’ या कंपनीने आपल्या कंपनीच्या शिशाच्या पेन्सिल उत्पादनाकरिता वापरात असलेला नायट्रोजन प्लांटला प्राणवायू प्रकल्पात परावर्तित करून हा प्रकल्प बोईसर येथील टिमा रुग्णालयात गरज भासेपर्यंत देण्यात येणार आहे.
  • या प्रकल्पाचे रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपनीने विनानफा तत्त्वावर हे काम करून दिले आहे. सुमारे साडेसहा लाख रुपये खर्चून परिवर्तित केलेल्या या प्राणवायू प्रकल्पातून तासाला ४५०० हजार लिटर ९६ टक्कय़ाहून शुद्ध प्राणवायू उत्पादित करण्याची क्षमता असेल.
  • हा प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर साधारण १५- २० रुग्णांना सलग प्राणवायू पुरवठा होऊ शकेल. या प्लांटमधून तयार होणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून मिळाल्यानंतर हा प्लांट पूर्णपणे कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले.
  • याकामी कंपनीचे उपाध्यक्ष किशोर वठे, वरिष्ठ व्यवस्थापक अजित राणे आणि मेंटेनन्स विभागाचे सर्व कर्मचारी मागील दहा दिवस अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Story img Loader