नीरज राऊत
भौगोलिक विविधतेने नटलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला वाव असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत आहे. मात्र, मद्यपान केलेल्या किंवा बेशिस्त पर्यटकांमुळे अपघात होण्याचे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या अथवा बुडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मौजमजेसाठी येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे जव्हार, मोखाडा भागात पर्यटन स्थळांवर बंदी लादण्यात आल्याने स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे.
पावसाळय़ात विविध ठिकाणी नदी, नाले, तलाव, धबधबे ओसंडून वाहत असल्याने तेथे पर्यटक आनंद घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात येतात. काही अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे तोल जाऊन अथवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचे प्रकार घडतात. धबधब्याच्या अथवा डोंगराच्या कडय़ावरून सेल्फी काढणे अथवा पाय घसरून दरीत पडण्याचे प्रकारदेखील घडतात. अतिउत्साहात भरधाव वाहन चालवणे, जोरजोराने गाणी वाजवत वाहन चालवण्यासोबत महिला, मुलींशी अश्लील वर्तन करणे, टिंगल टवाळक्या करणे व त्यामुळे वादाचे, मारामारीचे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. अपघातांचे प्रमाण पाहता अनेक जिल्ह्यांनी पावसाळी पर्यटनावर बंदी घातली आहे. काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यातही अशा प्रकारची पर्यटनबंदी घालण्यात आली होती. मात्र, या बंदीमुळे पर्यटनस्थळी पर्यटकांवर शासकीय यंत्रणांकडून विशेषत: पोलीस व वन विभागाकडून र्निबध घालण्यात येत होते. अनेकदा गुन्हे दाखल करण्याच्या भीतीपोटी पैसे उकळण्याचे प्रकार घडले होते. शिवाय पालघर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न व त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जात असताना पावसाळी पर्यटनावर बंदी न घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २०२१ मध्ये घेतला होता. या निर्णयाचे स्थानिकांनीही स्वागत केले होते. तब्बल दोन वर्षांनंतर एकापाठोपाठ एक अशा घडलेल्या घटनांमुळे जव्हार उपविभागीय अधिकारी यांनी सप्टेंबर अखेपर्यंत पर्यटनस्थळी बंदी लागू केली आहे.
ठाणे, मुंबई, नाशिक तसेच गुजरात राज्यातील अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यातील नद्या, धबधबे व गडकिल्ले येथे सध्या पावसाळी पर्यटनासाठी येत आहेत. उंचावर असणारे जव्हार, मोखाडा, खोडाळा, सूर्यमाळ ही पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची स्थळे निर्माण झाली आहेत. तेथे पर्यटकांमुळे खानपान व इतर पर्यटकांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळत असून, जिल्ह्यातील अनेक घटकांना हे उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. परंतु, ऐन हंगामात मोक्याच्या ठिकाणी पर्यटनबंदी लागू केल्याने त्यांना उत्पन्नाच्या शाश्वत साधनावर पाणी सोडावे लागणार आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच पर्यटनस्थळी अप्रिय घटना टाळण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये सावधानतेचे फलक लावणे, तेथे सुरक्षाव्यवस्था तैनात करणे, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या ठिकाणी किंवा गडकिल्ल्यांवर जाण्याच्या मार्गावर मद्यपान करून रिकामी बाटल्या टाकणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे.
पर्यटनस्थळांचा विकास कागदावरच
पर्यटनस्थळांच्या विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने कोटय़वधी रुपये खर्च केले असताना अनेक अनावश्यक कामे झाली आहेत. या कामांची दुबार देयके तसेच न झालेल्या कामांची देयके काढण्याचे प्रकारही घडले आहेत. विशेष म्हणजे जव्हार, मोखाडय़ातील पर्यटनस्थळांकडे जाताना आवश्यक रस्ते व पायवाटा, लगतच्या भागात कठडे व सुरक्षा उपाययोजनाच्या दृष्टिकोनातून कोणतीही सुविधा नसल्याने पर्यटन विकासाच्या नावे आलेल्या निधी ठेकेदारांनी अधिकारी वर्गाच्या मदतीने हडप केल्याचे आरोप होत आहेत. यापैकी अनेक कथित गैरप्रकरणांमध्ये चौकशी पूर्ण झाली असली तरी संबंधित दोषींविरुद्ध कारवाई झाली नसल्याचे माहिती पुढे येत आहे.
जव्हार-मोखाडा तालुक्यात पर्यटनबंदी
जव्हार तालुक्यात धबधबे व तलावाच्या ठिकाणी बुडण्याच्या दोन घटना घडल्यानंतर जीवितहानी टाळण्यासाठी धबधबे, नदी व तलावापासून एक किलोमीटर परिसरात पर्यटकांसाठी बंदी घालण्याचा निर्णय साहाय्यक जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे जव्हार व मोखाडा तालुक्यातील नागरिकांना पर्यटन व्यवसायामुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर या हंगामात पाणी सोडावे लागणार आहे.