वाडा : आदिवासी समाजाची रिती, परंपरा, कला, संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक प्रकारचे विधी, सण व उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी आदिवासी संस्कृती जोपासणारा पारंपरिक जगदंबे मातेचा अर्थात मुखवटा “बोहाडा” उत्सव आहे. जो साधारण तीन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत चालतो. ज्यात विविध देव- देवतांच्या मुखवट्यांसोबत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते.

आदिवासींचा प्रकृतीशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याने प्राकृतिक शक्तींना प्रसन्न करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, मोखाडा विक्रमगड, वाडा या तालुक्यात वारली, कातकरी, भिल्ल, कोकणा, ठाकर, महादेव कोळी या आदिवासींचा ‘बोहाडा’ हा मुख्य उत्सव असुन तो अत्यंत धूमधडाक्यात दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो. हा ‘भोवाडा’, ‘अखाडी, अखाडा” या नावानेही ओळखला जातो. वाडा तालुक्यात बोरांडा येथे “गुढीपाडव्याच्या” आदल्या दिवशी वेताळ देवाच्या नावाने ‘ बोहाडा” असतो. तो यावर्षी देखील आनंदात पार पडला. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड – रामपुर (गावितपाडा), जव्हार येथील चालतवड, पोयशेत, करढण, तर मोखाडा, खोडाळा यांसह अनेक ठिकाणी “बोहाडा” धूमधडाक्यात साजरा होतो. विक्रमगड तालुक्यातील रामपुर गावातील (गावितपाडा) उत्सवाची अनेक वर्षांपासून परंपरा अबाधित राहिली आहे. येत्या १४ एप्रिलला होणाऱ्या या उत्सवासाठी जय्यत तयारी सुरु झाली असुन ती अंतिम टप्प्यात आहे.येथे जगदंबा माता, गणपती, हनुमान, तारू, वाघोबा, सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, पाच पांडव, महादेव, काळबहरी, काळोबा, जांबू माळी, मासा, हळदोबा, द्वादशी, बहरोबा, हेडंबा, राम लक्ष्मण, रावण, नरसिंह, चंद्र- सूर्य यांसह जवळपास ५० मुखवटे घालून सोंगे घेतली जातात.

दरवर्षी जगदंबा उत्सवाला पालघर जिल्ह्यातून तसेच परिसरातून मोठा प्रतिसाद मिळतो. या उत्सवात सर्व जाती धर्मांची लोक एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी गुण्यागोविंदानं मोठ्या उत्साहात साजरा करतात.या उत्सवाचे महत्व असं आहे की, या उत्सवाला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही. अल्प बंदोबस्तातही हा उत्सव चांगल्या पद्धतीनं आणि सुरळीत पार पडत असतो. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आणि जोपासणाऱ्या बोहाड्याची २५० वर्षांहून अधिकची परंपरा अबाधित. आदिवासी संस्कृती जोपासणारा “बोहाडा” उत्सवाला साधारण २५० वर्षाहून अधिक मोठी परंपरा लाभली असल्याचे सांगितल्याचे जात आहे. त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होळी पासुन होवुन, ती चैत्र वैशाख महिन्यातील अक्षयतृतीये पर्यंत चालते. प्रत्येक गावाचा स्वतंत्र बोहाडा असतो, त्याची तिथी देखील वेगळी असते.

बोहाड्यामध्ये देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे विविध मुखवटे चेहऱ्यावर धारण करून, सोंगे घेतली जातात. अनेक ठिकाणी मोठ्या यात्रा किंवा जत्रा भरतात. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असुन आनंद लुटतात. देवांच्या मंदिरात सकाळपासूनच पूजा, होमहवन, आरती करून दर्शनासाठी रांग लागते घेतात. यावेळी अनेकजण नवस घेतात.

जवळपास ८० प्रकारची सोंगे नाचवली जातात

या बोहाडाच्या दिवशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरापासून ते शहराच्या वेशीपर्यंत कलाकार आपल्या डोक्यावर विविध देव देवतांचे मुखवटे परिधान करून पारंपरिक वाद्याच्या तालावर देवी-देवतांची वेशभूषा करून सोंगं नाचवण्याची अनोखी परंपरा आहे.सहभागी कलाकार नृत्य व युद्ध प्रसंग सादर करतात. सोबतच संबळ, पुंगी, पिपाणी, ढोल या वाद्यांच्या तालावर गावातून त्यांची मिरवणूक काढत त्या तालावर मुखवटे घातलेले कलाकार नाचतात.सोबतच इतर आदिवासी बांधव देखील नाचतात.

ही सोंग बघण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. रात्रभर ही सोंगं नाचवण्याची परंपरा चालत आली आहे. यात गणपती, हनुमान, वाघोबा, यांसह ६० ते ८० देवी-देवतांची सोंगं नाचवली जातात.त्यामुळे ही शहरातील नागरिकांवर, शेतीवर, गुरांवर येणाऱ्या संकटांवर मात करून पुन्हा मंदिराजवळ येतात, अशी आदिवासी समाजाची श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे २५० वर्षांपेक्षा अधिक असलेली ही प्रथा अशीच कायम रहावी म्हणून सर्व धर्मीय मोठ्या उत्साहात या सगळ्यात भाग घेतात. शिवाय या “बोहाडा” आदिवासी परंपरेमुळे गावातील ऐक्य टिकून राहत असल्याचं मत गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हस्तकौशल्याचे मुखवटे

सोंगांसाठी तयार करण्यात येणारे मुखवटे आदिवासी कलाकार हस्तकौशल्याने साग, उंबर ह्या लाकडात कोरीव कामाचा वापर करून बनविले जातात. हे मुखवटे रामायण व महाभारतातील गणपती, हनुमान, राम, सीता, लक्ष्मण, नूरसिंह, खंडोबा, भैरोबा, महादेव, रक्ताद हिडिंबा, त्राटिका यांसारख्या आदिवासींच्या परंपरागत देवी – देवतांचे रंगभूषा पोशाख करून सोंग नाचवली जातात.

बोहाड्यची सुरुवात आणि दिनक्रम

“बोहाडा”च्या पहिल्या दिवशी गणरायाची मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या दिवशी मत्स्यावतार, तिसऱ्या दिवशी कुर्मावतार, चौथ्या दिवशी वराहावतार, पाचव्या दिवशी भीम-हिडींबा विवाह व बकासूर युद्ध दाखवले जाते. सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठीला लहान बोहाडा आणि सप्तमीला रात्री आठ ते अष्टमीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत रात्रभर मुख्य बोहाडा उत्सव साजरा करतात. अष्टमीला सकाळी जगदंबा देवीची महापूजा केली जाते आणि देवी- महिषासुर, शुंभ-निशुंभ ह्यांच्या युद्धाचा प्रसंग दाखवतात.

कुळात सोंग घेण्याची परंपरा कायम

ज्या कुटुंबात किंवा कुळात परंपरेने सोंग घेण्याची प्रथा प्रचलित झालेली असते, तेथील व्यक्ती सोंग घेऊन ही परंपरा कायम चालवित असतात. अनेक कुटुंबांत संकटे, पूर्वजांचा कोप, अरिष्टे, दारिद्र्य निवारण, अपत्यप्राप्ती अशा अनेक कारणांसाठी नवस केले जातात. येथून त्या कुटुंबात बोहाडा सोंगाची सुरुवात होते. सोंग धारण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगात एक दैवी शक्तीचा संचार होतो, असा लोकांचा विश्वास आहे.

देवी – दैवतांचे सोंगांचे प्रकार

कुळ परंपरेतील बोहाडा उत्सवाची सोंगे फक्त पुरुषच घेतात, त्यासाठी त्यांना कडक व्रताचे आचरण करावे लागते. यावेळी ग्रामदेवतांबरोबर हिरवादेव, नारानदेव, वाघदेव, बापदेव, पेरसापेन, भीमालदेव या देवी-देवता व पूर्वजांची पूजा केल्या जाते.कुळ परंपरेनुसार सर्वांत आधी गणपतीचे सोंग काढले जाते, त्याच्या बाजूला शारदा देवी व नाचे असतात. त्यानंतर मारुती, जंबूमाळी, गावदेवी, बहिरी, सटवाई, महादेव, अग्निदेव यांची सोंगे घेतली जातात. रॉकेलचे टेंभे जाळून या सोंगांची गावातून मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चंद्र-सूर्य, खंडेराव, विष्णू, पवन देव, ब्रह्मदेव, बकासूर, नरकासूर, वीरभद्र, वेताळ, बली, पांडवताटी, भीष्म, वाली, सुग्रीव, राम-लक्ष्मण, रावण, अहिरावण-महिरावण, नरकासूर, पुतना मावशी, नारद, गुरव, ब्राह्मण, वाघ, साप, मगर, वराह (डुक्कर) अशी ४० हून अधिक प्रकारची सोंगे घेतली जातात. यातील प्रत्येक सोंगाचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते. वाद्यांचा सूर-ताल बदलताच सोंगाच्या नृत्याचा ढंग देखील बदलतो.

सोंगांचे विशेष आकर्षण

हनुमानाचे सोंग हे हातात गदा घेऊन लोकांमधून वाट काढत नृत्य करते. रावण दशमुखी मुखवटा घालून डरकाळ्या फोडतो. गावातील चौकाचौकांत राम-रावण, वाली-सुग्रीव, राम-मारीच, भीम-बकासुर युद्धाचे प्रसंग दाखविले जातात. यासाठी जवळपास ५० ते ७० प्रकारच्या मुखवट्यांचा वापर सोंगांसाठी केला जातो. रात्रभर सोंगांचे सादरीकरण होत असते. तीन दिवस हा उत्सव चालू असतो. तिसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी देवीचे सोंग काढले जाते, जी वाघावर बसलेली असते. काही दृश्यांमध्ये तिला महिषासुराचा वध करताना दाखविले जाते. अनेक लोक देवीच्या सोंगासमोर नवस फेडतात. देवीची आरती करून बोहाडा उत्सवाची सांगता होते.