विजय राऊत, लोकसत्ता वार्ताहर
कासा: दापचरी सीमा तपासणी नाक्यावरील मुंबई वाहिनीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. तपासणी नाका प्रशासन आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या असमन्वयामुळे तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहनचालकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. शिवाय छोटी वाहने आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आज (२९ नोव्हेंबर रोजी) संध्याकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर साधारण ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून यामुळे छोटी वाहने विरुध्द दिशेने प्रवास करत असल्याचे दिसून आले. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी रोजच वाहतूक कोंडी होत असून छोट्या वाहनांचा उलट दिशेने प्रवास सुरू असल्यामुळे प्रसंगी अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आणखी वाचा-पालघर जिल्ह्यातील किनारा लगतच्या ३९ गावांना मिळणार भुयारी विद्युत वाहिनीद्वारे वीजपुरवठा
तपासणी नाक्यावर सध्या मुंबई वाहिनी १० पैकी एकच वजन काटा बंद असून गुजरात वाहिनीवर १२ पैकी दोन वजन काटे बंद आहेत. त्यामुळे दोनही वाहिनीवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून याविषयी प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तपासणी नाका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील यावर ठोस उपाय करण्यात येत नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात येत आहे.