पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील १२१ किलोमीटरवर काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेताना शासकीय स्तरावर आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली नाही. तसेच बेशिस्त वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळ कार्यरत नसल्याने गेले पाच महिने या महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नियोजित ठिकाणी पोहोचण्याच्या वेळेबद्दल अनिश्चितता कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी असणाऱ्या मनोर- वाडा-भिवंडी मार्गाची दुरवस्था झाली असून मनोर (करळगाव) येथील पूल कमकुवत झाल्याने त्याचा वापर अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सहा पदरी राष्ट्रीय काँक्रिटीकरण कामाला आरंभ करण्यात आला. प्रारंभी एका बाजूच्या दोन मार्गिकांचे काम हाती घेण्यात आल्याने तसेच सेवा मार्गावरील खड्डे, गतिरोधक कायम राहिल्याने वाहनांच्या रांगा लागत असत. अशा स्थितीत विरुद्ध दिशेचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न वाहन चालकांकडून केला जात असताना त्यांना रोखण्यात अपयश आले.

यासंदर्भात लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराबरोबर अनेकदा बैठकांचे आयोजन केले. मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने हा प्रश्न गेल्या पाच महिन्यांपासून कायम राहिला आहे. मुंबई, ठाण्याकडे जाणारे प्रवासी, मुंबई विमानतळ तसेच रुग्णवाहिकांना या कोंडीचा फटका बसत आहे.

हेही वाचा >>> पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

पावसाळ्यापूर्वी ३५ टक्के काम पूर्ण

या महामार्गावरील गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर मनोर ते वर्सोवा तसेच गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वर्सोवा ते खानिवडे व मनोर ते अच्छाड दरम्यानचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ५५ ते ६० किलोमीटर रस्त्याच्या पट्ट्याचे सहा मार्गिकांचे काम पूर्ण होईल (३५ टक्के) असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे. पावसाच्या अनुषंगाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँक्रिटीकरणाचे काम थांबून आवश्यक ठिकाणी रस्त्याला जोडण्यासाठी उतार (रॅम्प) बनविणे व मान्सूनपूर्व तयारीला आरंभ करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापन सुमित कुमार यांनी दिली.

बंद पडणारी वाहने अथवा वाहनांचा अपघात झाल्यास वाहनांना बाजूला सरकविण्यासाठी क्रेन व इतर यंत्रणा कार्यक्षम नसल्याने अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. नियोजनाचा अभाव हे यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे.

दर्जाबाबत तक्रारी

सुमारे ५५३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबविताना काँक्रिटीकरणाचा दर्जा राखला न गेल्याच्या तक्रारी पुढे आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे विचारणा केली असता ३० एप्रिल २०२५ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करावयाचे असून रस्त्याच्या दर्जाबाबत तक्रारी असल्यास त्याची दुरुस्ती यापूर्वी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion on mumbai ahmedabad national highway due to lack of system preparation zws