कासा : कासा गावातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. चारोटी येथील टोलनाका तसेच दापचरी येथील चेकपोस्ट वाचवण्यासाठी अनेक अवजड वाहने कासामार्गे तलासरी, वाडा, भिवंडीकडे प्रवास करतात. त्यामुळे कासा गावांतील मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
कासा गावाजवळून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरील चारोटीजवळ टोलनाका आहे. तर दापचरी येथे आरटीओ आणि सीमा तपासणी नाका आहे. चारोटी येथे मोठय़ा वाहनांना पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान टोल आकारला जातो. तर दापचरी येथे गाडीतील माल वाहतूक नियमांनुसार आहे की नाही, याची तपासणी केली जाते. तसे नसल्यास दंडसुद्धा आकारला जातो. त्यामुळे चारोटी येथील टोल वाचवणे तसेच वाहतुकीचे नियम डावलून माल भरलेली वाहने दंडापासून वाचवण्यासाठी अनेक अवजड वाहने कासा, सायवन, तलासरी या मार्गाचा वापर करतात. काही वाहने तलासरीकडून येत कासा मार्गे वाडा, भिवंडीकडे जातात. यामुळे कासा गावातील मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. वाहतूक
कोंडी होते आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कासा गावांतला हा रस्ता काही अवजड वाहनांकरिता बनलेला नाही. त्यामुळे या रस्त्यांवरून अवजड वाहने जाताना अनेकदा विजेच्या तारा तुटण्याच्या घटनाही घडतात.
स्थानिक वाहन चालक, पायी चालणारे नागरिक आणि अवजड माल वाहतूक करणारे वाहनचालक यांच्यामध्ये अनेकदा वादावादीही होत असते. अवजड वाहनांचे चालक रात्रीच्या वेळी भरधाव वाहने हाकतात त्यामुळे अपघातही झालेले आहेत.
स्थानिक पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यांनी सदर वाहनावर कठोर कारवाई करून कासा येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.