पालघर : पालघर शहरातील प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही समस्या सोडवण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील तुफान वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या वातावरणात दुचाकी चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हुतात्मा स्तंभ या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसून येते. या चौकांच्या लगत असणारे अतिक्रमण दूर करण्यास तसेच वाहनांना डावीकडे सहजपणे वळण्यासाठी तरतूद नसल्याने प्रामुख्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात विविध पातळीवर पाठपुरावा करण्यात आला असला तरी पालघर शहरातील प्रमुख रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे असल्याने या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण दूर करण्यास नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.
रस्त्याच्या कडेला व विशेष चौका लगतच्या भागात अनेक हातगाड्या व अनधिकृत विक्रेत्यांनी जागा बळकावली असून काही ठिकाणी वृक्ष तर इतर काही ठिकाणी विद्युत खांब उभारण्यात आलेले आहेत. शिवाय मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या दुकानदारांकडे येणाऱ्या ग्राहकांकडून दुचाकी पार्किंग केले जात असल्याने वाहनांचा प्रवास करणे कठीण होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून हुतात्मा स्तंभ ते तहसील कचेरी तसेच आयसीआयसीआय बँक पासून आर्यन शाळेपर्यंत असणाऱ्या रस्त्यांवर देखील तुफान वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय डॉ. आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात सुमारे ८० ते १०० मीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे जिल्हा वाहतूक विभागाकडून प्रत्येक चौकामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येत आहे. मात्र वाहनांची वाढलेली संख्या, काही वाहन चालकांचा बेशिस्तपणा व काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला करण्यात येणारे पार्किंग हे या वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असताना देखील रस्त्यावरील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे वेगवेगळ्या कारणांना पुढे करून पालघर नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे
अतिक्रमण काढण्यास टोलवाटोलवी
रेल्वे स्टेशन परिसरातील प्रमुख रस्ते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा करून व समन्वय साधून अधिक्रमण हटवण्याची कारवाई करणे सोयीचे राहील अशी भूमिका पालघर नगर परिषदेने जनता दरबारात उपस्थित केलेले या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. तसेच पालघर शहरातील प्रमुख रस्त्यांवर नगरपरिषदेने पाणी वाहून नेण्यासाठी गटार उभारणी केली आहे.
या गटारा पलीकडे अधिक्रमण निष्काशीत करून त्या ठिकाणी पादचारी मार्ग करणे शक्य होईल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड मार्जिन व त्यावर झालेले अतिक्रमण याची रेषा निश्चित करून सीमांकन केल्यास पालघर नगर परिषदेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाची समन्वय साधून कारवाई करण्यात येईल अशी भूमिका जनता दरबार मध्ये उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना मांडण्यात आली आहे.