लोकसत्ता वार्ताहर
कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. चारोटी जवळ मुंबईकडे जाणाऱ्या दोन मार्गिकेवर काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बरेच वाहने उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाल्याने सेवा रस्त्याने जात आहेत त्यामुळे नाशिक डहाणू राज्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
आणखी वाचा-‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणणार का?’, पंकजा मुंडेंच्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. चारोटी, चिल्लार फाटा , मेंढवन खिंड घाट या भागात हे काँक्रीटीकरण सुरू आहे. काँक्रीटीकरण करताना दोन मार्गिकेवर काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी केवळ एकच मार्गिका उपलब्ध होते. त्यातच सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्याही संपत आल्याने गुजराकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे चारोटी उड्डाणपुलाखाली तसेच पुलावरही वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तसेच अनेक वाहने सेवा रस्त्यावरून जात असल्याने नाशिक डहाणू मार्गावरही वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.