लोकसत्ता वार्ताहर
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांकडून बॉडीवॉर्न कॅमेऱ्याची मागणी करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींवर योग्य उपाय करता येणार आहे.
सर्वत्र वाहतुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना वाहतुकीच्या नियमांबाबत अनेकवेळा जनजागृती करण्यात येते. मुख्य रस्ते, महामार्ग व चौकांमध्ये वाहन चालकांकडून नियमभंग होताना दिसून येतो. याला आळा बसण्यासाठी व वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बॉडीवॉर्न कॅमेराची मागणी वाढत आहे. हे कॅमेरे नागरिकांशी संवाद आणि घटनांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी उपयुक्त आहेत.
पालघर वाहतूक विभागाकडून २० कॅमेऱ्यांची मागणी करण्यात आली असून हे कॅमेरे शहरी भागातील मुख्यतः पालघर, बोईसर, डहाणू या शहरांच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पोलिसांना लावण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघात करून, वाहतुकीचे नियम तोडणारा आपला गुन्हा अनेक वेळा कबूल करत नाही. अशावेळी हे बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड केलेले पुरावे न्यायालयात सादर करता येऊन गुन्ह्यांची चौकशी अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. यामुळे रस्त्यावर घडणारी प्रत्येक घटना रेकॉर्ड केली जाणार असून वाहतूक नियंत्रण यासह अन्य बाबीवर लक्ष देण्यास मोठी मदत होणार आहे.
१०० दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण व तंत्र स्नेही उपक्रम राबवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडीवॉर्न कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात २० कॅमेऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.
कॅमेऱ्याचा कसा होणार वापर
बॉडीवॉर्न कॅमेऱ्याचे वाटप हे रस्त्यावर कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना केले जाणार आहे. प्रामुख्याने बॉडीवॉर्न कॅमेरा हे उपकरण पोलिसांच्या वर्दीवर खिशावर लावले जाणार आहे. यामुळे रस्त्यावर घडणारी प्रत्येक घटना ऑडिओ व्हिडिओद्वारे सहजपणे रेकॉर्डिंग करण्याची सोय आहे. हे यंत्र विद्युत चार्जिंगच्या मदतीने काम करत असल्याने ते दररोज वापरणे शक्य होणार आहे.
नागरिकांच्या तक्रारीचे देखील होणार निरसन
वाहतूक पोलिसांच्या कामाबाबत काही वेळा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असतात. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तर वाहतूक पोलिसांकडून विनाकारण अडवणूक करून पैशांची मागणी केली गेल्याच्या स्वरूपाच्या तक्रारींत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांकडील बॉडी-वॉर्न कॅमेऱ्याच्या मदतीने वाहनचालक व वाहतूक पोलिसांमधील आरोप- प्रत्यारोपातील सत्यता पडताळता येणार आहे.
वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. तसेच काही वेळा नियम तोडल्यानंतर देखील वाहन चालक ती स्वीकारत नाही. अशावेळी हे कॅमेरे पुरावा म्हणून वाहतूक पोलिसांना मदत होणार आहे. -सुरेश साळुंखे, वाहतूक पोलीस अधिकारी