पालघर : पालघर जिल्ह्यात १६ व्या शतकात उभारलेल्या डहाणू या ऐतिहासिक किल्ल्याचा कायापालट करण्यात आला आहे. येथील कार्यालयांचे किल्ल्याच्या अस्तित्वाला कोणताही धक्का न पोहोचवता सुशोभीकरण करण्यात आले आहे. या किल्ल्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय कार्यालयांनाही नवी झळाळी मिळाली असून डहाणूतील नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी ही कार्यालये आणि किल्ला आकर्षणाचा केंद्रिबदू ठरत आहे.
सोळाव्या शतकात बांधण्यात आलेल्या या किल्ल्यामध्ये डहाणूचे तहसील कार्यालय, कारागृह, दुय्यम निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय यांच्यासह निवडणूक, पुरवठा, कुळवहिवाट, संजय गांधी-इंदिरा गांधी निराधार योजना कार्यालये कार्यरत होती. त्याचबरोबरीने या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल साठवून ठेवण्यासाठी एक खोली राखीव ठेवण्यात आली होती.
डहाणूच्या किल्ल्याची कालांतराने दुरवस्था झाली होती. या किल्ल्यात असलेल्या अवशेषात चार बुरूज, दोन तोफा, एक पडकी विहीर, महाद्वार यांचा समावेश होता. या किल्ल्यातील बुरूज ढासळलेले व वृक्षांमुळे भिंतीला तडे गेल्याबाबतचे वृत्त ‘ऐतिहासिक डहाणू किल्ल्याची दुर्दशा’ या मथळय़ाखाली ‘लोकसत्ता’मध्ये ८ मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध झाले होते.
कोविड काळात डहाणू तहसीलदार पदाची धुरा सांभाळणारे अभिजित देशमुख यांनी या ऐतिहासिक किल्ल्याचा कायापालट करण्याचा विचार मांडला. पुरातत्त्व विभागाकडे हा किल्ला वर्ग नसल्याची खात्री केल्यानंतर या विभागाच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या तांत्रिक सूचनांचे पालन करून या किल्ल्याचा ‘मेक ओवर’ करण्याचा आराखडा अंतिम केला.
डहाणू नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान तसेच लोकसहभागातून सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्राच्या किल्ल्याचा गेल्या चार महिन्यांत कायापालट करण्यात आला आहे. या परिसरात असणारी दुय्यम निबंधक व कोषागार कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित झाली असली तरीही इतर कार्यालये या सुशोभीकरण केलेल्या वास्तूमध्ये पूर्ववत सुरू झाली आहेत. डहाणूवासीयांच्या या पुढाकारामुळे एका पुरातन वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवून आकर्षकरीत्या सुशोभीकरण झाले आहे.
या किल्ल्याची डागडुजी केल्यानंतर दर्शनी भागात तोफा बसवण्यात आल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या मध्ये बगीचा तयार केल्याने सौंदर्यात भर पडली आहे. प्रशासनाची परवानगी घेऊन दिवाळीला दीपपूजन तर दुसऱ्याला गडपूजन दूर्गप्रेमी करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये परिवर्तनाची प्रबळ इच्छा असल्यास दुर्लक्षित व दुर्दशा असलेल्या वास्तूचे आकर्षक व मनमोहक ठिकाणामध्ये रूपांतर होऊ शकते याचे डहाणू किल्ला व त्यामधील तहसील कार्यालय हे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे म्हटले जात आहे.
ऐतिहासिक पाऊलखुणा सांगणारी वास्तू
डहाणू किल्ल्याच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला खाडी अशी नैसर्गिक तटबंदी लाभली असून दमण व तारापूर यांतील समुद्री दळणवळणावर वचक ठेवण्यासाठी डहाणू किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. पोर्तुगीजांनी हा किल्ला उभारल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याची १० व ३० फूट उंच तटबंदी, चार मनोरे आणि भक्कम बांधकामाचे बुरूज अशी किल्ल्याची बांधणी आहे. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत १७३९ साली डहाणू किल्ला स्वराज्यात आला असल्याची नोंद आढळते. इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांच्या काळात किल्ल्याची नासधूस झाली होती. तर इ.स. १८८८ मध्ये येथे पोलीस व रेव्हेन्यूची कचेरी थाटण्यात आली होती. डहाणू किल्ल्याच्या सध्या उपलब्ध असणाऱ्या वास्तू अवशेषांत चार बुरूज, दोन तोफा, विहीर, महाद्वार इ. समावेश आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात बऱ्याच जुन्या वास्तू नामशेष करण्यात आल्या. इ.स. १८६२ च्या नोंदीनुसार डहाणू येथे पडकी विहीर असलेला व झाडांनी आच्छादलेला एक भक्कम किल्ला होता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader