राज्य शासनाच्या पुढाकाराने आणि एमएमआरडीएच्या प्रयत्नाने सूर्या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळत आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पातून आता ४०३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार असून त्यातील १७० एमएलडी पाणी विरारला दिले जाणार आहे, तर उर्वरित २१८ एमएलडी पाणी मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार आहे. या योजनेतून काही प्रमाणात पाणी ग्रामीण भागालाही मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सूर्या प्रकल्पाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ९ एप्रिल रोजी सूर्यानगर येथे केली. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. सूर्या नदीतून पाणीपुरवठा करण्याची महत्त्वकांक्षी योजना प्रगतीपथावर असून सहा महिन्यांच्या आत ती पूर्ण होईल आणि मीरा-भाईंदरकरांना नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारकडून मिरा-भाईंदरकरांना वारंवार “तारीख पे तारीख” देण्यात आल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आणि सरकारला याबाबत ‘घरचा आहेर’ दिला. प्रकल्पाच्या विलंबामुळे स्थानिक जनतेमध्ये निर्माण झालेली नाराजी लक्षात घेता शासनाने योजनेच्या कामांना वेग दिला आहे. विशेष म्हणजे सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार आणि मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागासाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे.
याबाबतही मंत्री सरनाईक यांनी शासन यावर योग्य तोडगा काढेल तसेच सिंचनासाठी शेतकऱ्यांनाही पाणी मिळेल असे आश्वासन दिले. सूर्या प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांमधील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच ग्रामीण भागात उद्भवणारी पाण्याची समस्या देखील यामुळे काही अंशी कमी होऊन त्याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळणार असल्याने हा प्रकल्प संपूर्ण परिसरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.