वाडा: २४ हजार हेक्टर क्षेत्रांनी व्यापलेली वाडा तालुक्यातील जंगल संपत्ती आजही वनविभागाच्या कडक कायद्यांमुळे अबाधित राहिली आहे. या जंगलातील विविध प्रकारची झाडे वेगवेगळय़ा मोसमात फळा, फुलांनी बहरत असतात. सद्या येथील जंगलात पळस, बहावा, सावर ही जंगली झाडे फुलांनी बहरली आहेत. या झाडांच्या कमी- जास्त बहरण्यावरून येथील शेतकरी यावर्षी पाऊस कधीपासून व किती प्रमाणात पडेल याचा ठोकताळा बांधत असतात.
गुलाबी फुलांनी सजलेला पळस, पिवळा धमक झालेला बहावा तर सफेद फुलांनी बहरलेली सावर ही तीन जंगली झाडे सद्या फुलांनी बहरून गेली आहेत. या रान झाडांच्या बहरण्यावरून यावर्षी उत्तम पाऊस होईल असा अंदाज येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. निसर्गातील हे संकेतही त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या धारणेनुसार नानाविध प्रकारचे असतात. शेतकऱ्यांच्या परंपरागत अनुभवानुसार हे संकेत दरवर्षीच अगदी हुबेहूब खरे ठरत आहेत. असाच मुबलक प्रमाणातील शेतीपूरक पावसाचा संकेत देणारा ‘बहावा‘ वृक्ष पिवळय़ा धम्मक फुलांनी येथील जंगलात बहरला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरू लागले आहे.
पळस या वृक्षाच्या फुलांनी या वर्षी लवकर बहरण्यास सुरुवात केल्यामुळे पावसाची सुरुवात अधिक काळ न लांबता र्नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या कालावधीत म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीलाच पर्जन्यधारा बरसू लागतील असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्षी लवकर पाऊस येण्याचा अंदाज येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
बहावा वृक्ष हा वन औषधी म्हणून ओळखला जातो. बहरलेला बहावा सुरुवातीला उत्तम तर नंतर मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान राहणार असल्याचे संकेत देत असल्याचे येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
नैसर्गिक बदलांच्या ठोकताळय़ावर शेतकऱ्यांचा विश्वास
हवामान खात्याने पावसासंदर्भात दिलेले अंदाज अनेकदा फोल ठरतात. मात्र येथील काही जाणकार, अनुभवी शेतकऱ्यांनी निसर्गातील बदल व काही रान झाडांच्या बहरण्यावरून वर्तविलेले अंदाज खरे ठरल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. पक्षांचा घरटी बांधण्याचा कालावधी तसेच ठरावीक पक्षांचे ठरावीक आवाजाने ओरडणे या प्रकाराहून काही शेतकरी वर्तवीत असलेले पावसाचे अंदाज खरे ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
निसर्ग, वृक्ष, पक्षी यांनी दिलेल्या बदलांच्या अनुषंगाने गेली ४० वर्षे यशस्वीपणे भातशेती करीत आहे. -अशोक हरी पाटील, शेतकरी, रा. दाभोण, ता. वाडा.