डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे बुधवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये चालक अझरुद्दीन खान यास किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कंटेनर आणि त्यामधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
कंटेनरमध्ये तेलसदृश पदार्थाची वाहतूक केली जात होती. अपघातामुळे तेल महामार्गावर सांडले होते. यामुळे रस्ता निसरडा झाला असून वाहतूक विस्कळीत झाली होती. दुसऱ्या एका घटनेत आंबोली येथील कठीयावाडी हॉटेलमधील कामगाराचा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात प्रवास करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
तर कासा-सायवन राज्य मार्गावर बांधघर येथे रस्त्याच्या कामासाठी निघालेल्या रोडरोलरवरील कामगार तोल जाऊन पडून चिरडून मृत्युमुखी पडला. कासा पोलीस ठाणे हद्दीत वरील तिन्ही अपघात घडले असून या बाबतचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.