कुणाल लाडे
डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील प्रसिद्ध देवी महालक्ष्मीच्या गडाशेजारी असलेल्या पायलीचा गड (विवळवेढे गड) येथे गिर्यारोहणासाठी आलेली एक महिला गडाच्या वाटेवरून ५० फूट खाली कोसळली. सुदैवाने हातातील आधारासाठी असलेली काठी (स्टिक) गडाच्या उतारावर खोचून आणि झाडाचा आधार घेतल्याने ही महिला खाली ७०० ते ८०० मीटर खोल दरीमध्ये पडण्यापासून बचावली. गावचे उपसरपंच व अन्य एका सहकार्याने या गिर्यारोहकाचा बचाव केल्याने किरकोळ जखमा जखमा झालेली ही गिर्यारोहक सुखरूप मुंबईला परतली.
विवळवेढे गड येथे अश्विनी परळकर (४३) राहणारी कांदिवली आणि कल्याणी कापडी (४४) राहणारी विलेपार्ले या दोन गिर्यारोहक महिला गिर्यारोहणासाठी आल्या होत्या. पहाटे ५.३० वाजता चर्चगेट डहाणू रेल्वेने डहाणू गाठून तिथून प्रवासी रिक्षाने दोघी विवळवेढे येथे आल्या. त्यांनतर ९.३० वाजता दोघींनी गड चढायला सुरुवात केली असून १२ वाजता गड चढून १२.३० पर्यंत खाली उतरण्यास सुरुवात केली. गडाच्या मुख्य उंचवटा उतरून खाली येत असताना साधारण १.२५ वाजता दरम्यान निसरड्या वाटेवरून अश्विनी परळकर हीचा पाय घसरून ती दरीत ५० फूट खाली कोसळली. सुदैवाने गिर्यारोहणासाठी आवश्यक साहित्य अश्विनी कडे असल्यामुळे हातातील स्टिक आणि एका झाडाच्या सहाय्य घेत तिने स्वतःला सावरले. त्यांनतर सहकारी कल्याणी कापडी यांनी प्रसंगावधान राखत डहाणू ते विवळवेढे पर्यंत रिक्षाने आलेल्या चालकाला संपर्क करून गावातील एका दुकानदाराचा संपर्क क्रमांक घेतला. त्यांनतर गावात संपर्क केल्यावर साधारण २ वाजता गावचे तरुण उपसरपंच प्रकाश हाडळ आणि त्यांचे एक सहकारी मोबाईल लोकेशन वरून ३ वाजता कल्याणी पर्यंत पोहोचले आणि अवघ्या १५ ते २० मिनिटात प्रकाश हाडळ यांनी अश्विनी परळकर यांना दरीतून वर काढण्यात यश मिळवले आहे.
अश्विनी आणि कल्याणी या दोन्ही महिला गिर्यारोहक असून गेल्या अश्विनी साधारण व कल्याणी २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून गिर्यारोहण करत असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली. मात्र एवढ्या वर्षात हा पहिलाच थरारक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.गावातील उपसरपंच प्रकाश हाडळ व त्यांचे एक सहकारी यांनी प्रसंगावधान राखत अश्विनी यांना दरीतून वर काढले आहे. मात्र यापुढे असे प्रसंग होऊ नयेत यासाठी गिर्यारोहणासाठी येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटकांनी गडाची माहिती असल्याशिवाय गिर्यारोहणाचा प्रयत्न करू नये असे आवाहन उपसरपंच प्रकाश हाडळ यांनी केले आहे. तर यापुढे महालक्ष्मी गड सोडून इतर गडांवर चढण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून बंदी घालणार असल्याची माहिती प्रकाश यांनी दिली आहे.