लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर : पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असणाऱ्या हौशी शिकाऱ्यांच्या समूहाने रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेले असता प्राणी समजून एका सहकार्याकडून गोळी झाडली गेल्याने दोन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला तब्बल आठ दिवस झाल्यानंतर ही माहिती गुपित ठेवण्यात या सहकाऱ्यांना यश लाभले. चुकून गोळी झाडून मृत पावलेल्या दोघांपैकी एकावर शिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून दुसऱ्या इसमाचा जंगलात गाडून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वनप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे उघड झाले आहे.
पालघर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील बोरशेती, किराट, रावते व आकोली या गावातील सुमारे १०-१५ हौशी शिकाऱ्याने २८ जानेवारी रोजी बोरशेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाण्याचा निश्चय केला. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या सहभाग भ्रमणध्वनी वरून निश्चित करून शिकारीनंतर जंगलातच जेवण करण्याचे ठरल्याने मीठ, मसाला, तेल व भांडीकुंडी घेऊन शिकारी मंडळी रात्री मोहिमेवर निघाले होते.
बोरशेरीच्या जंगलात अलन डोंगरा च्या पायथ्याशी आंब्याचे पाणी या ठिकाणी पट्टेदारी वाघ व २०० किलो वजनापेक्षा मोठ्या वजनाची रानडुक्कर पाणी पिण्यासाठी येत असल्याचे माहित शिकाऱ्याना असल्याने, काही कट्टाधारी शिकारी डोंगराच्या कड्यावर तर काही बंदूकदारी जंगलातील झाडांवर बसून होते. या दरम्यान समूहातील काही सदस्य विलंबाने ठिकाणाजवळ येऊ लागले होते. मात्र त्यांनी आपल्याकडील मोबाईलचा टॉर्च अथवा बॅटरी सुरू केली नव्हती व आवाज येऊ नये म्हणून त्यांनी फोन करण्याचे टाळले. अमावास्येची रात्र असल्याने जंगलात मिट्ट काळोख होता.
मध्यरात्री च्या सुमारास शिकाऱ्यांना कसली तरी चाहूल लागल्याने डोंगराच्या कडावर बसलेल्या एका बंदूक धाऱ्याने जनावर आल्याचे समजून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात रमेश जन्या वरठा (६०, बोरशेती) याचा जागीच मृत्यू झाला तर ही गोळी त्याला छेडून अन्य महालोडा नामक अन्य एका सहकाऱ्याच्या पायाला लागली.
भयभीत झालेल्या या स्थानिक शिकाऱ्यांनी रमेश वरठा याला जंगलात गाडून ठेवण्याचे निश्चित केले व त्यांच्यापैकी अन्य चार जणांनी शिगाव पाटीलपाडा येथे राहणारा महालोडा नामक शिकाऱ्याला त्याच्या घरी नेले. महालोड यांच्या पायामधून रक्तस्त्राव सुरू राहिला मात्र घटनेबाबत गुपित राखण्यासाठी त्याला औषधउपचारासाठी दवाखान्यात वा रुग्णालयात नेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये त्याचा ३१ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मृत्यू पश्चात त्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या घटनेबाबत मनोर पोलीस स्टेशन मध्ये काल (ता ४) स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. रमेश वरठा याचा मृतदेह ताब्यात मिळाला असून या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती पोलीस अथवा स्थानिकांमधून गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आले होते.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेबाबत मनोर पोलिसांना काल (४ फेब्रुवारी) रोजी विचारणा केली असता या घटनेबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलेहोते. मात्र पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रमेश वरठा यांचा मृतदेह सापडल्याचे आज लोकसत्ताला सांगितले. या प्रकरणात अन्य एका शिकाऱ्यच्या मृत्यू झाल्याबाबत तपास सुरू असून त्याबाबत निश्चित सांगता येणार नाही असे पोलीस अधीक्षक यांनी पुढे सांगितले. या प्रकरणात मनोर पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
बोरशेती जंगलाची निवड का ?
बोरोशेतीच्या जंगलात पट्टेदारी वाघ व मोठ्या आकाराचे रानडुक्कर असल्याने त्यांच्याकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक शिकारी या जंगलात जाण्याचे टाळत असतात. या जंगलातील आंब्याचे पाणी या ठिकाणी वनप्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याने त्या ठिकाणी शिकारीसाठी या समूहाने जाण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे समूहात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक किंवा दोन गावठी कट्टे असल्याची माहिती पुढे आली आहे.