पालघर : देहाळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील दोन महिला देहाळे जवळील नदीत पहाटेच्या वेळी मासे पकडण्यासाठी गेल्या असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात वाहून गेल्या. दोन्ही महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये गंगी करबड (वय ४५) आणि गुलाबी दांडेकर (वय ५५) यांचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नदी, ओढे, नाले यामध्ये मासेमारी केली जाते. पहाटेच्या वेळेस नदीपात्रात खेकडे, चिंबोऱ्या मिळतात. त्यामुळे अनेक नागरिक घरी खाण्यासाठी मासे, खेकडे पकडायला जातात. देहाळे येथील दोन महिला आज पहाटे मासे पकडायला गेल्या असताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. या प्रवाहामध्ये दोन्ही महिला वाहून गेल्या.
पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोन्ही महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील गंगी करबड या महिलेचा मृतदेह खानीव गावाच्या हद्दीत सकाळी ९ वाजल्याच्या आसपास नदीपात्रात आढळून आला, तर दुसरी महिला गुलाबी दांडेकर हिचा मृतदेह तपास सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चारोटी जवळील पुलाजवळ सापडला. पाऊस असल्याने नागरिकांनी नदीपात्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.