लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर तालुक्यातील उमरोळी या सुमारे १० हजार लोकवस्तीच्या गावामध्ये ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या दात्यांच्या मदतीने ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम कार्यरत केला.

उमरोळी ग्रामपंचायती मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित पालघरचे पोलीस निरीक्षक अनंत पराड व त्यांचे सहकारी उपस्थित होते. याप्रसंगी उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच रजनीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील कार्यकर्ते कमळाकर तरे, राजेश पाटील, माजी सरपंच अंकिता तऱे, स्वेजल पाटील, रश्मी पाटील, रोटरी क्लब ऑफ उमरोळीचे अध्यक्ष सागर घरत, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरोळी गावातील विकासकांकडून तसेच दात्यांकडून ३२ कॅमेरे व त्याला जोडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पालघर बोईसर मार्ग, उमरोळी रेल्वे स्टेशन तसेच गावातील पश्चिमेच्या बाजूच्या वेगवेगळ्या आळ्यामध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बोईसर व पालघर कडून येणाऱ्या वाहनांचा नंबर प्लेट क्रमांक टिपण्यासाठी विशेष दोन कॅमेरे कार्यरत असून या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष ग्रामपंचायत कार्यालयात बसवण्यात आले आहे.

उमरोळी गावात १२०० घरे असून गेल्या काही वर्षात ५० इमारती उभ्या राहिल्या आहेत. गावात येणाऱ्या नागरिकांवर तसेच फेरीवाल्यांवर लक्ष राहावे व चोरीच्या प्रकारांवर आळा बसावा या उद्देशाने कॅमेरा बसवण्याचा उपक्रम राबवल्याची माहिती सरपंच प्रभाकर पाटील यांनी दिली. गावाच्या पूर्वेकडील भागात २५ कॅमेरे बसवण्याचे ग्रामपंचायतीने योजिले असून या दुसऱ्या टप्प्याचे काम देखील लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात आले. उमरोळी गावाने राबवत असणाऱ्या या उपक्रमामुळे पालघर बोईसर येथून होणाऱ्या वाहतुकीवर ग्रामपंचायत तसेच आवश्यकता भासल्यास पोलिसांची नजर राहणार आहे.

फेरीवाल्यांसाठी ग्रामपंचायतीची परवानगी

गावात फेरीवाल्यांच्या माध्यमातून बंद व निर्जन ठिकाणी असणाऱ्या घरांची रेखी होऊन चोरीचे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने फेरीवाल्यांना ग्रामपंचायतीकडून परवानगी घेण्याचा उपक्रम २०२३ च्या अखेरीपासून राबविण्यास सुरू केला आहे. प्रत्येक फेरीवाल्याने ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंदणी करून आठवड्याला एकदा किंवा दोनदाच गावात यावे असे ठरवून देण्यात आले असून या उपक्रमामुळे गावातील चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण आल्याचे दिसून आले आहे.

इतर ग्रामपंचायतीने करावे अनुकरण

पालघर व बोईसर परिसरात झालेल्या औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ठिकाणी चोऱ्यांचे प्रकार वारंवार घडत असतात. या अनुषंगाने सरावली, पंचाळी, कोळगाव व पालघर शहरात अशाच प्रकारचे सीसीटीव्ही प्रमुख रस्त्यांवर कार्यान्वित झाल्यास चोऱ्यांच्या प्रमाणावर आळा बसेल तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होऊ शकेल.