पालघर : २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ५४७.८५ हेक्टर कृषी क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या संदर्भातील सविस्तर पंचनामे करण्याची कारवाई हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे डहाणू व तलासरी वगळता उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये कृषी क्षेत्रावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रफळामध्ये भात शेतीचे सुमारे ९० टक्के प्रमाण असून नागली व भाजीपाला लागवडीचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग तसेच संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली आहे.
हेही वाचा – सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी
सुक्या मासळीचे नुकसान
डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यात समुद्रकिनारी गावी मासळी सुकवणाऱ्याचे अवेळी पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसंचालक दिनेश पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा – धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम
२६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे प्राथमिक अंदाजानुसार पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राप्त माहितीनुसार निदर्शनास आलेले आहे.