कासा : पालघरच्या पूर्व भागात असलेल्या मोखाडा तालुक्यात आज सायंकाळी अचानक जोरदार वादळ व अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे फळबाग व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

मोखाडा तालुक्यासोबतच वाडा, विक्रमगड, जव्हार या भागात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अवकाळी पावसामुळे परिसरातील काजू-आंबा शेतकरी आणि वीट उत्पादक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उघड्यावर साचून ठेवलेला पेंढा व गावात अवकाळी पावसात भिजले आहे. या पावसामुळे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने ३१मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळाचा इशारा दिला होता. या कालावधीमध्ये पाऊस पडला नसला तरी गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान राहिले होते.

मोखाडा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. मोखाडा तालुक्याच्या अनेक भागात गारपीट सुद्धा झाली. तसेच वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्याच्या काही भागातही वादळी पाऊस व गारपीट झाली.

जिल्ह्याच्या पूर्व भागात आंबा व काजूंची फळझाडे मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी हवामान चांगले असल्याने आंबा व काजूला चांगला मोहर आला होता. बऱ्याच आंब्याच्या फळझाडांना लहान लहान कैऱ्या सुद्धा आल्या होत्या. आज आलेले वादळ, पाऊस व गारपीट यामुळे काजू आंबा या फळझाडांना आलेला मोहोर गळून पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, फळझाडे उन्मळून पडली तसेच अनेक झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. अनेक घरावरचे (छप्पर) पत्रे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने वीट उत्पादकांचीही मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. पावसाची शक्यता नसल्याने सुकवत असलेल्या वीटभट्टीला लावलेल्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

फळ उत्पादक शेतकरी आणि वीट उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने तात्काळ शेतीचे व घराचे नुकसान झाले चे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी तसेच नागरिकांनी केली आहे.