वाडा : वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे घर तसेच आंबा, चिकू फळांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याबाबत पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषि व महसूल विभाग कार्यालयाला दिले होते, त्यानुसार प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाला असुन अंतिम अहवाल मात्र प्रतिक्षेत आहे. यानंतरच निश्चित नुकसान किती प्रमाणात झाले आहे हे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान खात्याने ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार ०४ एप्रिल रोजी वाडा, मोखाडा या तालुक्यांत अचानक विजेच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता.तर अनेक ठिकाणी गारपीट झाली. दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला वादळी वारा व पाऊस जवळपास दीडतास सुरु होता.
या अचानक आलेल्या पावसामुळे वाडा, मोखाडा तालुक्यांतील नागरिक व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली, तर अनेकांचे घरांवरील पत्रे देखील उडविले गेले.अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. घरांचे तसेच आंबा, चिकू फळबागायतर आणि रब्बी पिक, भाजीपाला यांसह हरभरा, तुर, वाल, भुईमूग, यांसारखी कडधान्ये पिके काढणीसाठी सज्ज होती. या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होवून नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
ढगाळ वातावरणाचा व अवकाळी पावसाचा आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून शासनाकडून तात्काळ मदत केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान हे पंचनामे अद्याप हि सुरूच आहेत.
वाडा तालुक्यातील नुकसान
पालघर जिल्ह्यात ०४ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने वाडा तालुक्यातील वाडा, मांगरुळ, परळी, जामघर, नेहरोली, खुपरी, आलमान, वरई, किरवली, कुयलू, वरसाळे, सापने खुर्द, अबिटघर, तिळगांव, कळंभे, दाढरे, निशेत, पिंपरोळी, सारशी, तुसे, मोज या २१ गावांतील एकूण १५० घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.तर वाडा तालुक्यातील ६२ गावांमधील २८२ शेतकऱ्यांचे साधारण ६९.३९ हेक्टर आंबा, चिकू फळबागसह इतर शेती पिकांचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालाच्या अनुषंगाने नुकसान झाले असल्याची माहिती वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.अद्याप पर्यंत पंचनामे सुरू असुन अंतिम अहवाल प्रतिक्षेत असल्याचे सांगितले आहे.
मोखाडा तालुक्यातील नुकसान
मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने आंबा, काजू फळझाडांसोबत वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.यात चार साझांमधील दुधगाव, गोमघर, वाशिंद, खोडाळा, आडोशी, पाथर्डी, बोटोशी, कुर्लोद, खोच ही एकूण नऊ गावांमधील ८४ नागरिकांची घरे बाधित झाली आहेत. सध्या स्थितीला पंचनामे सुरू आहेत.दरम्यान, मागील आठवड्यात शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असल्या कारणामुळे आंबा, काजू व इतर फळबाग व शेती पिकांचे पंचनामे सुरू केले असून किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती समोर आली नसल्याची जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.