पदभरतीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे प्रयत्न तोकडे
निखिल मेस्त्री
पालघर : पालघर नगर परिषदेत अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामांसह अतिरिक्त इतर रिक्त पदांच्या कामांची जबाबदारीही देण्यात आल्याने ताण वाढला आहे. परिणामी त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांच्या आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.
पालघर नगर परिषदेची लोकसंख्या कमी असली तरी प्रशासकीय कामाचा पसारा मोठा आहे. नगर परिषदेमध्ये आरोग्य, नियोजन, लेखा व वित्त, करनिर्धारण, घरपट्टी, बांधकाम, अग्निशमन दल, सामान्य प्रशासन, नगररचना, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, सांस्कृतिक कार्य तसेच प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग आहेत. या विभागांचे प्रशासकीय प्रमुख यांच्याकडे इतर विभागांच्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे. माहिती अधिकारांचे अर्ज, नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारीचे निरसन व प्रशासकीय कारभार पाहताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही कर्मचारी वर्ग सोडला तर संपूर्ण नगर परिषदेचा कारभार कंत्राटी पद्धतीने आहे. सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बांधकाम, अतिक्रमण, वृक्ष प्राधिकरण, व्यावसायिक ना-हरकत दाखले आदी जबाबदाऱ्या आहेत. नऊ जणांची जबाबदारी असल्यामुळे घरपट्टी वसुली होत नाही. त्यामुळे प्रशासकीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार एकाच अभियंत्याच्या खांद्यावर आहे.
वर्ग ३ व ४ मधील ५२ पदे रिक्त
नगर परिषदेत अनेक पदे मंजूर आहेत, परंतु ती भरली गेली नाहीत. त्यात स्वच्छता निरीक्षक दोन आरोग्य अधिकारी एक, आरोग्य सहायक तीन, तारतंत्री एक, वरिष्ठ लिपिक चार, वाहनचालक दोन, गाळणी चालक व प्रयोगशाळा साहाय्यक सहा, उद्यान पर्यवेक्षक एक, ग्रंथपाल एक साहाय्यक ग्रंथपाल दोन, मुकादम तीन, तर फायरमॅनच्या चार पदांचा समावेश आहे. तर सफाई कामगारांची तीसपैकी २५ पदे, व्हॉल्वमन १७ पैकी ८, लिपिक टंकलेखक संवर्गातील १३ पैकी आठ, ऑपरेटर दोनपैकी एक, शिपाई आठपैकी पाच पदे भरलेली आहेत. वर्ग-३ संवर्गातील ३७ पदांपैकी नऊ, वर्ग चार मधील ६२पैकी ३८ पदे भरलेली आहेत.
अधिकारी पदाची २६ पैकी ७ पदे रिक्त
नगर परिषदेत अभियांत्रिकी सेवा प्रकारातील स्थापत्य विभाग पाचपैकी एक पद भरलेले आहे. याचअंतर्गत संगणक विभागाकरिता एक, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी लेखा एक, तसेच अग्निशमन विभागातील पदे रिक्त आहेत. नगर रचनाकार आणि विकास सेवा प्रकारांमध्ये नगर परिषदेत तीनपैकी दोन पदे भरलेली आहेत. तर वित्त लेखापाल व लेखा परीक्षक विभाग तीनपैकी दोन, करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊपैकी आतापर्यंत एकच पद भरलेले आहे.
नगर परिषदेमार्फत वरिष्ठ प्रशासनाकडे रिक्त जागा भरण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार व मागण्या केलेल्या आहेत. लवकरच ही रिक्त पदे भरली जातील व प्रशासकीय घडी व्यवस्थित बसेल अशी आशा आहे.
– स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद
रिक्त पदांच्या भरतीबाबत नगरविकासमंत्री यांच्यासमक्ष बैठक आयोजित केली होती. पुढील आठवडय़ात या विभागाच्या उच्च प्रशासकीय अधिकारीसोबत भरतीसंदर्भात चर्चा होणार आहे.
– कैलास म्हात्रे, गटनेते, पालघर नगर परिषद