पालघर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या जय भीम पदयात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उद्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पालघर, बोईसर, तारापूर, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, सफाळे, मनोर, पास्थळ यासह अनेक शहर व गावांमध्ये विविध ठिकाणी सकाळच्या सुमारास बाबासाहेबांचा प्रतिमेला सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मानवंदना देण्यात येणार आहे.

आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मुंबईसह राज्यभर आज “जय भिम पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आज सकाळी सात वाजता हुतात्मा चौक येथून “जय भिम पदयात्रा” सुरु करून आंबेडकर चौक येथे समारोप करण्यात आला. या पदयात्रेत पालघर जिल्हयातील विविध विद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, एनवायकेएस, भारत स्काउट गाईड, माय भारत यामधील विद्यार्थी तसेच प्रशासकीय अधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून स्वाक्षरी भिंत देखील उभारण्यात आली होती. या भिंतीवर उपस्थित नागरिकांनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या.

पालघर शहरातील टेंभोडे, नवली आणि आंबेडकर नगर येथून निघालेल्या मिरवणुका आंबेडकर चौकात तर बोईसर मधील भीम नगर, पाम,  कुंभवली आणि शहराच्या विविध भागातून आलेल्या मिरवणुका मधुर नाका आंबेडकर चौक येथे एकत्र येऊन समारोपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच अनेक भागात सायंकाळच्या वेळी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

आंबेडकर जयंती निमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, लोक वाचन चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह नागरिकांकडून डॉ. आंबेडकर यांच्या लेखन, भाषणे आणि तत्त्वज्ञानविषयक कार्यांची पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.

इतर कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन आंबेडकरांच्या पुतळ्याला मानवंदना देतात. शहरात व गावांमध्ये सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी वाजत गाजत व भीम गीतांवर नाचत रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. यासह सांस्कृतिक कार्यक्रम, अभिवादन समारंभ, भीमगीते, महिला मंडळाचा अष्टगंध कार्यक्रम, विविध स्पर्धा, पुस्तक स्टॉल, तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन व ग्रंथप्रदर्शन व त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.