पालघर / वसई : वसई किल्ला ते भाईंदर दरम्यानचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे रो रो सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी या सेवेचे उद्घाटन प्रस्तावित होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हि सेवा सुरु होण्यास विलंब होत आहे. ओहोटीच्या प्रसंगी एका भागात गाळ साचल्याने या काळात रो रो सेवेचा मार्ग बदलण्यात आला असून ही सेवा बदललेल्या मार्गावरून पुढील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. जान्हवी या बोटी मधून ३० वाहने, १०० प्रवासी सुमारे साडेतीन किलोमीटरचे अंतर १५ मिनिटांत पार करण्याची क्षमता आहे. यामुळे सध्या या दोन शहरातील रस्त्यामार्गे ३८ किलोमीटरचे अंतर पार करण्यात ५० ते ५५ मिनिटांची बचत होईल अशी अपेक्षा आहे.
जान्हवी या बोटीला पूर्ण क्षमतेने वजन वाहून नेताना दीड मीटर पाण्याच्या पातळीची (ड्राफ्ट) ची गरज असून मोठी व मध्यम ओहोटीच्या दरम्यान सागरी मंडळाच्या जल आलेख विभागाने नमूद केलेल्या मार्गावरून प्रवास करणे सुरक्षित आहे. मात्र मोठ्या ओहोटीच्या दरम्यान बोटीच्या सुरक्षित प्रवासा करिता पाण्याची पातळी उपलब्ध राहण्याबाबत पांजू बेटाजवळ गाळ साचलेल्या एका भागात शंका निर्माण झाल्याने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जल आलेख विभागाने मोठ्या ओहोटीच्या दरम्यान पर्यायी मार्गाचे रेखांकन केले आहे. यामुळे बोटीच्या प्रवास अंतरामध्ये सुमारे एक सागरी मैलची वाढ होण्याची शक्यता असून प्रवास वेळ काही मिनिटांनी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : वसई : कर्जवसुलीसाठी एजंटच्या धमक्या, कंटाळून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
दरम्यान या रो रो सेवेचा बदललेल्या मार्गीकेवरून प्रायोगिक तत्त्वावर आरंभ पुढील आठवड्यात करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली. पर्यायी मार्ग सुरक्षित असल्याची खातरजमा केल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गाळ साचलेल्या (सँड बार) जागेत वाळूचे उत्खनन (ड्रेजिंग) करण्यासाठी महसूल विभागाकडे परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात बोट चालकाकडून नव्याने सुचवलेल्या मालिकेवर प्रायोगिक फेऱ्या सुरू केल्या असून सेवेचा आरंभ करण्याबाबत अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले.
हेही वाचा : न्यायालयाच्या निकालापूर्वीच अधिसूचना, २९ गावे वसई विरार महापालिकेत समाविष्ट
रो रो सेवा सुरू होण्याबाबत दोन्ही शहरांतील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून १३ फेब्रुवारी रोजी ही सेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात हिरमोड झाली होती. दरम्यान दोन्ही ठिकाणी जेटी व प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिक्षालय, शौचालय, तिकीट काउंटर यांची उभारणी पूर्ण झाली आहे असून या सेवेच्या आरंभ बाबतच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे.